क्वारंटाइन व्यक्तीच्या मृत्यूने वाढविले टेंशन

विनायक हेंद्रे
Saturday, 23 May 2020

घरात क्वारंटाइन करण्यात आलेल्या एका ५३ वर्षीय व्यक्तीचा शनिवारी (ता. २३) पहाटे मृत्यू झाला. त्यामुळे आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून मृताचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.

आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) : कामठा (ता. कळमनुरी) येथील घरात क्वारंटाइन करण्यात आलेल्या एका ५३ वर्षीय व्यक्तीचा शनिवारी (ता. २३) पहाटे मृत्यू झाला. सदर व्यक्ती (ता. १२) रोजी नांदेड येथून गावात आली होती. त्यामुळे आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून मृताचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून आरोग्य विभागाचे टेंशन वाढविले आहे. 

कामठा (ता. कळमनुरी) येथील ५३ वर्षीय व्यक्ती कामानिमित्त नांदेड येथे गेली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर (ता.१२) मे रोजी मृत व्यक्ती गावात आली होती. मात्र, गावात आल्यानंतर प्रकृती ठिक नसल्यामुळे पुन्हा दोन दिवसांपूर्वी उपचारासाठी नांदेड येथे नेण्यात आले होते. 

हेही वाचामुंबईवाल्यांनी वाढविला घोर, पुन्हा आले सहा पाॅझिटिव्ह

नांदेड येथे उपचार

नांदेड येथे उपचार करून आल्यानंतर त्या व्यक्तीला होम क्‍वारंटाइन करण्यात आले होते. मात्र, शनिवारी पहाटे मृत्यू झाला. यामुळे कामठासह कामठा फाटा परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. 

आरोग्य पथकाने कामठा येथे घेतली धाव 

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आखाडा बाळापूर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर सावंत, डॉ. गजानन भारती, कामठा उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. कृष्णा जगदाळे यांच्या पथकाने कामठा येथे धाव घेतली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मृत व्यक्तीसह त्यांच्या पत्नीचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.

स्वॅब अहवालाकडे लागले लक्ष

 दरम्यान, मृत व्यक्तीला इतर आजार असल्याची माहिती समोर येत आहे. परंतु, स्वॅब नमुन्याचा अहवाल काय येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गावात आरोग्य पथक, पोलिस अधिकारी, कर्मचारी हजर झाले असून खबरदारी म्हणून विशेष काळजी घेण्यात येत आहे.

१८ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार

दरम्यान, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १०७ वर पोचली असून यातील ८९ रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आता १८ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. मुंबई येथून आलेल्या काही ग्रामस्थांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने अगोदरच आरोग्य विभागाचे टेंशन वाढले असताना यात ५७ वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूची भर पडली आहे. 

येथे क्लिक कराहिंगोली बाजारपेठेतील बहुतांश व्यवहार सुरू

काळजी घेण्याचे आवाहन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. मात्र, अनेक नागरिक अनावश्यक कारणासाठी घराबाहेर पडत आहेत. यातून कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अत्यंत महत्‍वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, सभोवती असणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांपासून सतर्क राहण्यासाठी आपल्या मोबाइलवर ‘आरोग्य सेतू’ ॲप डाऊनलोड करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tension increased by the death of a quarantine person Hingoli news