पंधरा कोटींच्या घोटाळाप्रकरणी तिघांची सेवासमाप्ती, गुन्हेही नोंद होणार

सकाळ वृत्तसेवा 
Sunday, 3 May 2020

  • सीईओ अजित कुंभार यांची कारवाई 
  • आमदार विनायक मेटेंची होती तक्रार 
  • बीड पंचायत समितीमधील मनरेगामधील घोटाळा 
  • गटविकास अधिकारी तुरुकमारेंचीही विभागीय चौकशी 
  • २५ कामांची ३१ बोगस हजेरीपत्रके 

बीड - बीड पंचायत समितीमधील येथील नरेगाच्या कामांत तब्बल १४ कोटी ८० लाख रुपयांच्या अनियमिततेचा प्रकार चौकशीत समोर आला आहे. याप्रकरणी तिघांची सेवासमाप्ती करून त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे नोंद करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत. पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांचीही विभागीय चौकशी प्रस्तावित केली आहे. याप्रकरणी शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी तक्रार केली होती. 

बंडू राठोड, श्‍याम पंडित व प्रशांत आबूज अशी कारवाई झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर गुन्हे नोंद करण्यासाठी गटविकास अधिकारी रवींद्र तुरुकमारे यांना प्राधिकृत केले आहे. कुठलेही अभिलेखे नसताना बीड पंचायत समितीअंतर्गत बांधबंदिस्ती, एलबीएस, सीसीटी अशा प्रकारची २५ कामे सुरू असल्याचे दाखवून २५ ते ३० मजुरांच्या उपस्थितीची ३१ हजेरीपत्रके तयार करून शासन तिजोरीवर गंडा घालण्याचा प्रयत्न केला होता.

हेही वाचा - जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून आधी देशाला वाचवा...बघा कोण म्हणतंय... 

याबाबत आमदार विनायक मेटे यांनी १५ कोटी ७३ लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याची तक्रार केली होती. या प्रकरणाच्या चौकशीत २५ कामांत १४ कोटी ८० लाख रुपयांच्या निधीची अनियमितता आढळून आली. याप्रकरणी श्‍याम पंडित, बंडू राठोड व प्रशांत आबूज हे तिघे दोषी आढळून आले. त्यामुळे या तिघांच्या सेवा समाप्त करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंद करण्याचे निर्देश दिले आहेत. तर, गटविकास अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष आढळून आल्याने त्यांच्यावरही विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली. विशेष म्हणजे कामांचे जिओ टॅगिंग करताना कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन करण्यात आल्याचेही समोर आले आहे. कामांच्या मान्यता नियमबाह्य असून पूर्वपरवानगी न घेताच जिओ टॅगिंग केल्याचे समोर आले आहे. 

हेही वाचा - देश लॉकडाऊन न करताही कोरोनाशी लढा, वाचा या देशाची कहाणी...

या प्रकरणात कारवाईचे स्वागत आहे. परंतु कारवाई झालेले हे छोटे चोर आहेत. यातील प्रमुख दरोडेखोरांवर कारवाई व्हायला पाहिजे. गटविकास अधिकारी, अभियंते यांच्यासह इतर अधिकारी व पदाधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. 
- आमदार विनायक मेटे, अध्यक्ष, शिवसंग्राम. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Termination of three in a scam of Rs 15 crore