बीडमधील चंदन चोरीचे परराज्यात कनेक्शन, तीन लाखांची पावडर जप्त 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 March 2020

बीड जिल्ह्यातील चंदनचोरीचे आंतरराज्य कनेक्शन उघड झाले असून वनविभागाच्या पथकाने पथकाने मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथे चंदन ऑईलच्या कारखान्यावर छापा मारून तीन लाखांची चंदन पावडर हस्तगत केली आहे. 

अंबाजोगाई (जि. बीड) - तालुक्यातील दत्तपूर शिवारात चोरी झालेल्या चंदनचोरी उघडकीस आल्यानंतर याचे धागेदोरे मध्य प्रदेशात असल्याचे निष्पन्न झाले आहे. येथील वनविभागाच्या पथकाने मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथे चंदन ऑईलच्या कारखान्यावर छापा मारून तीन लाखांची चंदन पावडर हस्तगत केली. यात पकडलेल्या सहा आरोपींना सोमवारी (ता. दोन) प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता त्यांना बुधवारपर्यंत (ता. चार) पोलिस कोठडी सुनावण्यात आली. 

अंबाजोगाई तालुक्यातील दत्तपूर शिवारात चंदन चोरीचा प्रकार घडल्यानंतर वनविभागाने २६ फेब्रुवारीला सीताराम गणेश कसबे, शिवराम दत्तात्रय सुरवसे, सुनील कोंडीराम साळवे, दिगंबर आबा गायकवाड, गजानन भास्कर लांडगे (रा. तांदुळजा, ता. जि. लातूर) या पाच जणांना अटक केली होती. त्यांना न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलिस कोठडी दिली होती. पकडलेल्या आरोपींकडून तपासात अमर बलभीम हुलगुंडे याचे नाव समोर आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. 

हेही वाचा - कोंबड्यांमध्ये खरंच कोरोना विषाणू आहे का?

सहा जणांची तपासणी केली असता या टोळीच्या मुख्य सूत्रधाराची नावे पोलिस तपासात पुढे आली आहेत. मात्र, हे तिघेही अद्याप फरारी आहेत. पकडलेल्या आरोपींकडून या टोळीचे धागेदोरे मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथे असल्याचे उघड झाले. वनविभागातील चंदनाची चोरी करून ते चंदन बऱ्हाणपूर येथील एका ऑइल्स कंपनीकडे विक्री केले जात असल्याचे निदर्शनास आले. 

हेही वाचा - शेतकरी म्हणतो, साहेब मी जिवंत....अधिकारी म्हणतात मेला

येथील वनविभागाच्या पथकाने बऱ्हाणपूरच्या कंपनीत तेथील वनविभागाच्या साह्याने छापा टाकला असता त्या कंपनीत १४७ किलो अवैध चंदनाची पावडर हस्तगत करण्यात आली. वनविभागाने केलेल्या परराज्यातील कारवाईत वनपरिक्षेत्र अधिकारी आर. बी. शिंदे, एम. एस. मुंडे, वनपरिमंडळ अधिकारी शंकर वरवडे, जी. बी. कस्तुरे, वनमजूर एस. डी. पारवे, डी. एन. गित्ते, एम. एम. तपसे यांचा समावेश आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft of sandalwood in Beed district