...तर मग भरा दंड

5e583363fee23d3fd10eac33.jpg
5e583363fee23d3fd10eac33.jpg


धर्माबाद, (जि. नांदेड) ः शहरात कोरोना संसर्गाविषयी नागरिक गांभीर्याने घेत नसल्याचे अनेक प्रकार पाहावयास मिळतात. सार्वजनिक ठिकाणी तोंडावर मास्क न बांधणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, सोशल डिस्टन्स न ठेवणे अशा लोकांवर दंडात्मक कारवाईचा सपाटा मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या मार्गदर्शनात पालिका कर्मचाऱ्यांनी सुरू केला आहे. गुरुवारी व शुक्रवारी शहरात मास्क किंवा रुमाल न बांधता फिरणाऱ्या ४३ लोकांवर दंडात्मक कारवाई करून आठ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

कडक अंमलबजावणी
कोरोना विषाणू (कोविड-१९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात सीमाबंदी, संचारबंदी, सोशल डिस्टन्स न ठेवणे, मास्क लावणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे आदी निर्बंध लादण्यात आले आहेत. नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. धर्माबाद तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण नसून तालुका सध्या कोरोनामुक्त आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुका प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात असून त्याची कडक अंमलबजावणी संबंधित यंत्रणेकडून करण्यात येत आहे.


प्रत्येकी दोनशे रुपये दंड
धर्माबादेत सार्वजनिक ठिकाणी वावरण्याबाबत नगराध्यक्षा अफजल बेगम अब्दुल सत्तार, उपनगराध्यक्ष विनायकराव कुलकर्णी व मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी चर्चा करून दंडात्मक कारवाई करण्यासाठी सोमवारी आदेश काढले. यात सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास प्रतिबंध, सोशल डिस्टन्स न ठेवणे, आवश्यक कामासाठी बाहेर निघणाऱ्या प्रत्येकाला चेहऱ्यावर मास्क व रुमाल लावणे अनिवार्य केले आहे. मात्र, त्यानंतरही अनेक जण मास्क न लावता शहरात विनाकारण फिरत असल्याचे दिसून आले. त्याविरुद्ध नगरपालिकेने मोहीम उघडली असून त्यासाठी सहा पथके नियुक्ती केली आहे. ही पथके विविध ठिकाणी तपासणी करून सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क न लावणाऱ्या व्यक्तींना प्रत्येकी दोनशे रुपये दंड ठोठावण्यात येत आहे. गुरुवारी व शुक्रवारी या दोन दिवसांत ४३ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून आठ हजार ६०० रुपये दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे. ही कारवाई पालिकेचे कर्मचारी दत्तू गुर्जलवाड, दीपक कोठारे, मारोती उल्लेवाड, नागेश अपुलोड, नितीनकुमार धावणे, सूर्यकांत मोकले, राम मुळे, कांता उशलवार, मनोहर तुंगनवार, रमेश घाटे, राजरत्न सूर्यवंशी, रुक्माजी भोगावार, भीमराव सूर्यवंशी, अविनाश सोनकांबळे, राजेश खटके, लक्ष्मण उमडे आदींनी केली आहे.

नागरिकांनी आवश्यक कामासाठी बाहेर निघतांना चेहऱ्यावर मास्क व रुमाल लावूनच बाहेर निघावे. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये. विनाकारण घराबाहेर पडू नये. कोरोना आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी प्रत्येकाने सहकार्य करणे अपेक्षित आहे.
- मंगेश देवरे, मुख्याधिकारी धर्माबाद.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com