पळशी येथे गोठ्याला आग, 60 हजारांचे नुकसान

सुनील पांढरे 
रविवार, 7 एप्रिल 2019

जमीन कमी असल्याने व दुष्काळी परिस्थिती असल्याने त्यांनी चारा विकत घेऊन ठेवला होता. चाऱ्याला व गोठ्याला आग लागली. यात दुध काढण्याचे यंत्राचे ही नुकसान झाले आहे.

अंधारी : पळशी (ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद) येथील शेतकरी गणेश बारकूसिंग जोनवाळ यांच्या गट क्रमांक 648 मध्ये गाईच्या गोठ्याला व साठवून ठेवलेल्या चाऱ्याला अचानकपणे आग लागल्याची घटना रविवारी (ता. 7) सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. या आगीत सुमारे 60 ते 70 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

गणेश हे कुटुंबांसह शेतवस्तीवर राहतात. दीड एकर जमीनमध्ये ते दहा गाईचे सांभाळ  करतात. जमीन कमी असल्याने व दुष्काळी परिस्थिती असल्याने त्यांनी चारा विकत घेऊन ठेवला होता. चाऱ्याला व गोठ्याला आग लागली. यात दुध काढण्याचे यंत्राचे ही नुकसान झाले आहे. बेरोजगारीला मात करत त्यांनी गेल्या दहा वर्षापासून दुध व्यवसाय सुरु केला आहे. नेहमीप्रमाणे ते सकाळी गावात दुध घेऊन आले. गोठ्याला अचानक आग लागल्याने त्यांच्या पत्नी व वडील यांनी गोठ्यातील गाई सोडून देण्यास सुरवात केली. तापमानामुळे आगीने लवकर पेट घेतल्याने त्यांच्या पत्नी देवका यांच्या हाताला व पायाला वासरांना सोडताना चटके बसले. मात्र यात जीवितहानी झाली नाही. धूर पाहून गावातून शेतकऱ्यांनी धाव घेत पूर्णपणे आग आटोक्यात आणली. आग कशामुळे लागली हे अजून स्पष्ट झाले नाही. दरम्यान दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून योग्य ती मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: There is a fire in the cowshed at Palshi sixty thousand have been lost