coronavirus - चुकीला माफी नाही; पहिल्यांदा दंड तर दुसऱ्यांदा फौजदारी 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 15 April 2020

  • रस्त्यावर थुंकण्यास बंदी; मास्क वापरणेही बंधनकारक 
  • कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय 
  • दुकानदारांनाही लावावा लागणार वस्तूंचा भावफलक 

बीड - कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. आता रस्त्यावर थुंकल्यास, मास्क न वापरल्यास पहिल्या वेळेस रोख दंड तर दुसऱ्या वेळेस थेट फौजदारी करण्यात येणार आहे. दुकानदारांनी देखील त्यांच्या दर्शनी भागात वस्तूंचे दरफलक लावणे बंधनकारक केले आहे. कारवायांचे अधिकारी नगरपालिका, नगर पंचायती व ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राहुल रेखावार यांनी सोमवारी (ता.१३) उशिरा हे आदेश निर्गमित केले. 

रस्ते, बाजारतळ, रुग्णालय, कार्यालय परिसरात थुंकल्यास एक हजार रुपये दंड होईल. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्यास व तोंड व नाक न झाकल्यास ५०० रुपयांचा दंड होणार आहे. दुकानदार, फळभाजीपाला विक्रेत्यांसह अत्यावश्यक साहित्याची विक्री करणाऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंग न ठेवल्यास त्यांच्यावरही दोन हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे.

हेही वाचा - युरोपातील सर्व देशांनी आता संयुक्त कृती करावी - डॉ. जॉन कार्लोस

किराणा व जीवनावश्यक वस्तू विक्रेत्यांनी वस्तूंचे दरपत्रक न लावल्यास पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला जाईल. रस्ते, बाजार, रुग्णालय, कार्यालय अशा ठिकाणी १८ वर्षापेक्षा कमी किंवा अंदाजे ६० वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीसोबत कोणी आढळून आल्यास त्यालाही एक हजार रुपये दंड होईल. भाजीपाला, किराणा वस्तू घेऊन जाण्यास दुचाकीचा वापर केला तर एक हजार रुपये दंड होईल. 

हेही वाचा - युकेचे पंतप्रधान  रुग्णालयात, जनता घरात बसून...

दरम्यान, असे प्रकार केल्यानंतर पहिल्या वेळेस वरीलप्रमाणे रोख दंड आकारण्यात येईल. यासाठी नियुक्त अधिकाऱ्यांनी याचे फोटो व व्हिडिओ चित्रण करावे. दुसऱ्या वेळी असे कृत्य केल्यानंतर फौजदारी गुन्हाही दाखल केला जाणार आहे. संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवांसाठी एक दिवसाआड शिथिलता असेल. ता. १५, १७, १९, २१, २३, २५, २७, २९ या तारखांना सकाळी सात ते साडेनऊ या वेळेत शिथिलता असेल. 

हेही वाचा - जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून आधी देशाला वाचवा...बघा कोण म्हणतंय... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is no forgiveness of wrong; Penalty first and criminal second