‘या’ जिल्ह्यातील १६ पोलिसांची होणार ‘कोरोना’ चाचणी

शिवचरण वावळे
Saturday, 18 April 2020

शनिवारी (ता.१८) एप्रिलला देखील तेलंगणाच्या सीमेवरुन नांदेड जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या एका भाजीपाला घेऊन येणाऱ्या गाडी चालकांचे मनसुबे भोकर पोलिसांनी उधळुन लावले आहे. मात्र, त्याच्या संपर्कात आलेल्या दोन्ही चेक पोस्टवरील १६ पोलिस कर्मचाऱ्यांना ‘कोरोना’ तपासणीस सामोरे जावे लागणार आहे.

नांदेड : तेलंगणातील एका वाहनचालक या पूर्वीच हातावर होम क्वॉरंटाईनचा शिक्का मारलेला असताना शनिवारी (ता.१८) भाजीपाला घेऊन भोकरमार्गे नांदेड जिल्ह्यात प्रवेश करण्याच्या तयारीने आला होता. परंतु, भोकर पोलिसांच्या सतर्कतेमुळे तेलंगणातुन आलेल्या त्या वाहनचालकास परतवून लावण्यात भोकर पोलिसांना यश आल्याने मोठा अनर्थ टळला.

तेलंगणातुन भाजीपाल्याने भरलेले वाहन भोकर चेक पोस्टहून पुढे रहाटी चेकपोस्टला शनिवारी आले होते. तेव्हा भोकर पोलिसांनी नांदेड जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी त्याची विचारपूस केली. यामध्ये ती व्यक्ती होम क्वॉरंटाईन असल्याची माहिती पुढे आली. तेव्हा त्यास तेलंगणाच्या पोलिस विभागाशी संपर्क करुन तेलंगणा पोलिसांच्या हवाली करण्यात आल्याची माहिती भोकरचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक विजय पवार यांनी दिली.

हेही वाचा- येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये ‘वर्क फ्रॉम होम’चा यशस्वी प्रयोग

वेळ पडल्यास करावे लागणार होमक्वॉरंटाईन
भोकर व रहाटी चेकपोस्ट वरील १६ पोलिस कर्मचारी तेलंगणातुन जिल्ह्यात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असलेल्या होम क्वॉरंटाईन चालकाच्या संपर्कात आल्याने त्या सर्व पोलिस कर्मचाऱ्यांची ‘स्वॅब’ची देखील तपासणी करण्यात येणार आहे. वेळ पडल्यास त्या पोलिस कर्मचाऱ्यांना होमक्वॉरंटाईन करावे लागेल, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.

हेही वाचा- ‘या’ कर्मचाऱ्यांनाही हवेय ५० लाखाचे विमा कवच, कोणाला ते वाचा...
कोरोना विषाणू संसर्गाबाबत नांदेड जिल्ह्यातील माहिती

- आत्तापर्यंत एकूण क्वारंटाईन - ६१४
- क्वारंटाईन कालावधी पूर्ण - १८२
- अजून निरीक्षणाखाली असलेले - २४
- दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये - ५२ (यात्री निवास- ४०)
- घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले - ५६२
- आज तपासणीसाठी घेतलेले नमुने - ५
- एकुण नमुने तपासणी- ३२७-
- पैकी निगेटिव्ह - ३१२
- नमुने तपासणी अहवाल बाकी- १०
- नाकारण्यात आलेले नमुने - ५
- जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी ७५ हजार ७७६ असून त्यांना त्यांच्या घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There Will Be A 'Corona' Test Of 16 Policemen In This District Nanded News