परभणी जिल्ह्यात दिवसभरात घडले हे गुन्हे....

download
download

परभणी ः शहरासह जिल्ह्यात दिवसभरात किरकोळ चोरी, फसवणूक, विवाहितेचा छळ अशा अनेक घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.  

पुर्णेत एकाची सोन्याची साखळी, रोख रक्कम पळविली
पूर्णा ः येथील ऑटोमोबाईल दुकानात धुडगूस घालून गळ्यातील सोन्याची साखळी व रोख साडेचार हजार असा एकूण ४२ हजार ५०० रुपयांचा ऐवज हिसकावून घेतल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध पूर्णा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जुन्या नगरपालिका कार्यालयाजवळ असलेल्या सोनू ऑटोमोबाईल्स या दुकानात दुकान मालक मनोज सूर्यभान उबाळे हे असताना सहा जणांनी मिळून त्यांच्या दुकानातील दिवसभरात आलेले ४५०० रुपये व गळ्यातील सोन्याची चैन याची किंमत अंदाजे ३८ हजार रुपये असा एकूण ४२ हजार ५०० रुपयांचा ऐवज जबरीने हिसकावुन घेतला तसेच फिर्यादीस रॉडणे, लाकडाने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मनोज सूर्यभान उबाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुनील साहेबराव काळे, कपिल साहेबराव काळे, साहेबराव काळे, विलास काळे, सुबोध सोनकांबळे, सतीश सावंत, पवन पंडित या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास फौजदार चंद्रकांत पवार हे करीत आहेत. 

दर्शनासाठी महिला निघाली अन् गळ्यातील तीन तोळ्याचे गंठण लंपास
परभणी: मकरसंक्रांतीनिमित्त दत्तधाम परिसरात हिंगलाज माता मंदिरात दर्शनासाठी जात असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील तीन तोळे वजनाचे ९० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे गंठण दुचाकीवरून आलेल्या तिघांनी हिसकावून पोबारा केल्याची घटना बुधवारी (ता.१५) घडली. याप्रकरणी गुरुवारी (ता.१६) नवा मोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संत तुकाराम नगर भागात राहणाऱ्या मिनाक्षी डोके या त्यांच्या सासु आणि ननंद यांच्यासोबत बुधवारी (ता.१५) जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास हिंगलाज माता मंदिरात दर्शनासाठी जात होत्या. या वेळी समोरून दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्यांच्या गळ्यातील गंठण हिसकावले. सोबत असलेल्या महिलांसोबत चोरट्यांची झटापट झाली. मात्र, चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले. घटनास्थळाला सहाय्यक पोलिस अधिक्षक नितीन बगाटे, रामेश्वर तट, रविंद्र इंगळे, सुनिल नायमाने यांनी भेट दिली. अज्ञाताविरोधात नवा मोंढा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तपास श्रीधर वाघमारे करत आहेत. 

फसवणूक प्रकरणात अजून दोन आरोपींना अटक
सोनपेठ ः स्वस्तात सोने देतो म्हणून नाशिक येथील व्यापाऱ्यास फसवणाऱ्या आरोपींपैकी दोन जणांना सोनपेठ पोलिसांनी अटक केली आहे. स्वस्तात सोने देतो म्हणून नाशिक येथील एका व्यापाऱ्याला फसवून (ता.१२) रोजी तालुक्यातील डोबाडी तांडा येथे बोलावून मारहाण करून तब्बल दोन लाख रुपयांना लुटले होते. त्यावरून सोनपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका संशयित आरोपीला अटक केली होती. तर (ता.१६) रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दोन आरोपींना अटक केली आहे. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात अजून काही आरोपींना अटक करणे बाकी असून पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोनपेठ पोलिस अधिक तपास करत आहेत.

सहा जणांविरुद्ध छळाचा गुन्हा
पूर्णा ः विवाहित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून सासरच्या सहा जणांविरुद्ध शारीरिक, मानसिक छळ केला म्हणून पूर्णा पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. १६) गुन्हा दाखल झाला आहे. विवाहिता नेहाराणी उर्फ देवयानी नितेश रेकलवार (रा. मानवता मंदिर, दत्तनगर आर्णी, ता. आर्णी, जि. यवतमाळ, हल्ली मुकाम बोर्डीकर प्लॉटिंग, अलंकारनगर, पूर्णा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिला सासरच्या मंडळीने संगणमत करून माहेराहून आई-वडिलांकडून घर बांधकामासाठी पाच लाख रुपये घेऊन ये म्हणून उपाशीपोटी ठेवून, शारीरिक व मानसिक त्रास देत लाथाबुक्यांनी मारहाण करत घराबाहेर हाकलून देत जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून पती, सासू, सासरा, दीर, ननंद व अन्य एक जण अशा सहा जणांवर पूर्णा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास जमादार जाधव करीत आहेत. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com