त्यांना गावाकडं यायचंय... आई-वडिलांची सेवा करायचीय!

प्रतिकात्मक छायाचित्र
प्रतिकात्मक छायाचित्र

लातूर : आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात येऊ इच्छिणाऱ्या भूमिपुत्र ग्रामसेवकांची व्यथा मोठी आहे. वर्षानुवर्षे प्रस्ताव देऊनही त्यांच्या संवर्गातील पद रिक्त नसल्याने त्यांची बदली होत नाही. यातील बहुतांश ग्रामसेवकांना गावाकडे येऊन म्हातारपणाची काठी होऊन आपल्या आई-वडिलांची सेवा करायची आहे. तसे कारणही त्यांनी प्रस्तावात दिले असून आई-वडिलांचे वय 75 वर्षांपेक्षा अधिक आहे. त्यांची सेवा करण्यासाठी आंतरजिल्हा बदली करावी, अशी मागणी सर्वांनी केली आहे.

जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने आंतरजिल्हा बदलीसाठी प्रस्ताव दिलेल्या ग्रामसेवकांची नुकतीच प्रतीक्षा यादी प्रसिद्ध केली असून त्यातूनच भूमिपुत्रांची व्यथा समोर आली आहे. 
गुणवतेच्या लातूर पॅटर्नमुळे अनेकजण राज्यभरातील विविध जिल्ह्यांत सरकारी नोकरीत आहेत. जिल्हा परिषदेच्या नोकरीत असलेल्यांची संख्या मोठी आहे. त्यात मोठ्या संख्येने शिक्षक आहेत.

शिक्षकांची आंतरजिल्हा बदली

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसाठी सरकारने ऑनलाइन प्रणाली सुरू केली असून दरवर्षी या प्रणालीतूनच त्यांच्या बदल्या होत आहेत. शिक्षक सोडले तर जिल्हा परिषदेतील ग्रामसेवक व अन्य कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच सुरू आहे. यात सरकारकडून प्राधान्य असलेल्या तसेच प्राधान्य नसलेल्या कारणांशिवाय कर्मचारी आंतरजिल्हा बदलीचा प्रस्ताव देतात.

ना-हरकत प्रमाणपत्र महत्वाचे

बदली होऊन यायच्या जिल्हा परिषदेकडून ना-हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर दुसऱ्या जिल्ह्यातील जिल्हा परिषदेकडून बदली करण्यात येते. यात संबंधित कर्मचाऱ्यांच्या संवर्गातील पद रिक्त असल्यानंतरच तसेच त्याने बदलीसाठी दिलेल्या कारणांची पडताळणी केल्यानंतरच ही बदली प्रक्रिया पूर्ण होते. दरवर्षी आलेल्या प्रस्तावांची जिल्हा परिषदेकडून प्रतीक्षा यादी तयार करण्यात येते. त्यानुसार ना-हरकत प्रमाणपत्र दिले जाते. लातूर जिल्हा परिषदेने ग्रामसेवक प्रवर्गातील आंतरजिल्हा बदलीसाठी वर्ष 2014 पासून 2018 पर्यंत प्रतीक्षा यादी तयार केली असून तब्बल 61 जणांपैकी 34 जणांनी वयोवृद्ध आई-वडिलांची सेवा करण्यासाठी बदली करण्याची मागणी केली आहे. हे कारण खरे असले तरी समाजातील सध्याचे वातावरण पाहता अनेकांचा त्यावर विश्वास बसत नसल्याची स्थिती आहे.  

ऑनलाईन व्यवहारात तरूणीला चार लाखाचा गंडा
प्राधान्यक्रमातील एक कारण 
आंतरजिल्हा बदलीसाठी सरकारने प्राधान्यक्रम निश्‍चित केले आहेत. यात अपंग, विधवा, महिला, दुर्धर आजार, पती-पत्नी एकत्रीकरण, माजी सैनिक आदी कारणांसोबत आई-वडील वयाने 75 वर्षांपेक्षा जास्त असून ते वार्धक्‍याने त्रस्त असल्याचाही प्राधान्यक्रम आहे. या कारणावरून प्राधान्याने बदली होत असल्याने एकतर्फी बदली करून घेणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून बदलीसाठी हे कारण पुढे केले जात आहे. काहींचे कारण खरे असेल; मात्र काहींनी प्राधान्य मिळते म्हणून हे कारण दिल्याचे सांगण्यात येत आहे. अनेकांकडे प्राधान्यक्रमातील कारण नसल्याने त्यांनी तो वगळून आंतरजिल्हा बदलीचे प्रस्ताव दिले आहेत. 

सुनांना करायचीय सासूची सेवा 
गावाकडे परत येण्यासाठी काहींनी कौटुंबिक अडचण पुढे केली, तर काहींनी स्वतःच्या जिल्हा असल्याने आंतरजिल्हा बदलीची मागणी करीत भूमिपुत्र असल्याचा अभिमान मिरवला आहे. प्राधान्यक्रमात वयोवृद्ध आईवडिलांची सेवा करण्याच्या कारणांसोबत वयोवृद्ध सासू व सासऱ्यांची सेवा करण्यासाठी बदली मागणाऱ्यांनाही प्राधान्य दिले जाते. वर्ष 2018 मध्ये दोन ग्रामसेवक महिलांनी त्यांच्या 75 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व वार्धक्‍याने त्रस्त असलेल्या सासू-सासऱ्यांची सेवा करण्यासाठी बदली करण्याची मागणी केली आहे. प्रस्तावात तसे स्पष्ट कारण नमूद केले आहे. 

काहींकडून उत्पन्नाचा मार्ग 
आंतरजिल्हा बदलीसाठी एकमेकांच्या सहमतीने अर्थात आपसी (म्युच्युअल) बदलीचा चांगला मार्ग आहे. या पद्धतीने बदली करून घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा संवर्ग एकच असावा लागतो. या पद्धतीने तातडीने बदली होते. यामुळे अनेकजण हा मार्ग पत्करतात. यात एकमेकांची गरज पाहून लाभ उचलला जातो. गरजवंत कर्मचाऱ्याच्या बदलीसाठी सहमती देणारा त्याच्याकडून रोख स्वरूपात रक्कम घेत असल्याचे प्रकार घडत आहेत. काहींनी तर नोकरीची काही वर्षे शिल्लक राहिल्यानंतर उत्पन्नाचा मार्ग म्हणून आपसी बदलीला सहमती देत आहेत. यातील पॅकेजचे दर गेल्या काही वर्षांत दोन लाखांपासून सात लाखांपर्यंत पोचल्याची चर्चाही जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांत घडून येत आहे. ऑनलाइन प्रणालीमुळे शिक्षक संवर्गात होणारा हा प्रकार बंद झाला तर अन्य कर्मचाऱ्यांत सुरू असल्याची माहिती मिळाली.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com