ऑनलाईन व्यवहारात तरुणीला चार लाखांचा गंडा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

फोन पेच्या गोल्ड स्कीममध्ये गुंतवणूक केल्यास कॅशबॅक मिळेल, असे आमिष दाखवले. कॉलनंतर तिला नोटिफिकेशन आले. त्यावर लिंकला क्‍लिक केल्यावर तिचे पहिल्यांदा 999, तर दुसऱ्यांदा 499 असे ट्रॅन्झॅक्‍शन केले. मात्र...

औरंगाबाद : ऑनलाईन व्यवहारात गंडवल्या जाण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. 'फोन पे'च्या सेफ गोल्ड स्कीममध्ये गुंतवणूक केल्यास कॅशबॅकच्या आमिषाची बतावणी करून 21 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला तीन लाख 97 हजार रुपयांना फसविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

हेही वाचा तो पाठवायचा तरुणींचे फोटो, मग झाले असे...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पदवीचे शिक्षण घेत असलेल्या 21 वर्षीय विद्यार्थिनीच्या नावावर काही रक्कम एसबीआय बॅंकेच्या खात्यात जमा होती. त्यातून ती रोजचे व्यवहार मोबाइलवर 'फोन पे'द्वारे करीत होती. दरम्यान, 30 नोव्हेंबरला या तरुणीला अनोळखी व्यक्तीने कॉल करून स्वत:चे मनोज नाव सांगत फोन पे कंपनीमधून बोलत असल्याचे सांगितले.

त्यानंतर फोन पेच्या गोल्ड स्कीममध्ये गुंतवणूक केल्यास कॅशबॅक मिळेल, असे आमिष दाखवले. कॉलनंतर तिला नोटिफिकेशन आले. त्यावर लिंकला क्‍लिक केल्यावर तिचे पहिल्यांदा 999, तर दुसऱ्यांदा 499 असे ट्रॅन्झॅक्‍शन केले. मात्र, तिला कॅशबॅक मिळाले नाही; शिवाय नोटिफिकेशन आले नाही.

क्लिक करा - बड्या लोकांशी ठेवायची संबंध, मग व्हिडिओ काढून करायची ब्लॅकमेल

त्यानंतर सतत नोटिफिकेशन येत जाऊन रक्कम कमी होत गेली. तरुणीने फोन पे कंपनीला कॉल करून आपल्याला गुंतवणूक करायची नसून, पैसे परत करण्याची मागणी केली. यानंतर तीन डिसेंबरला या तरुणीला पुन्हा एक कॉल आला. यामध्ये पैसे रिफंड करण्यासाठी तुम्हाला एक मेसेज येईल असे सांगण्यात आले. आलेले मेसेज तिने कॉपी करून कंपनीला पाठवले.

यावेळी तिला तुमचे एसबीआयचे अकाऊंट एएनडीबी भीम ऍपवर रजिस्टर झाले आहे असे सांगण्यात आले. यानंतर तीन डिसेंबर ते आठ डिसेंबर या कालावधीत तिच्या खात्यातून ऑनलाइन एकूण तीन लाख 97 हजार 589 रुपये काढून घेतले. याप्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून सायबर पोलिस ठाण्यात अज्ञातावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girl Cheated For Four Lac Rupees in Aurangabad