जालना : तीन दरोडेखोर गजाआड, साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

उमेश वाघमारे
Wednesday, 16 December 2020

समृद्धी महामार्गाच्या रस्त्यावरील पुलाचे कामावर असलेल्या वॉचमन व त्यांच्या साथीदारांचे हातपाय बांधून मारहाण करत लोखंडी सळाई लंपास करणाऱ्या तीन दरोडेखोरांना मंगळवारी (ता.१५) स्थानिक गुन्हे शाखेने पकडले आहे.

जालना : समृद्धी महामार्गाच्या रस्त्यावरील पुलाचे कामावर असलेल्या वॉचमन व त्यांच्या साथीदारांचे हातपाय बांधून मारहाण करत लोखंडी सळाई लंपास करणाऱ्या तीन दरोडेखोरांना मंगळवारी (ता.१५) स्थानिक गुन्हे शाखेने पकडले आहे. त्यांच्याकडून साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जामवाडी शिवारातील समृद्धी महामार्गावरील कामावर असलेल्या वॉचमनसह अन्य एकाला ता.दहा डिसेंबर रोजी हातपाय बांधून मारहाण करण्यात आली. त्यानंतर या दरोडेखोरांनी लोखंडी सळई लंपास केली.

 

 

या प्रकरणाचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेला एका संशयिताची माहिती मिळाली. त्यानुसार संशयित विनोद बबन शिरपुरे (वय२२, रा.घाणेवाडी) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक विचारपूस केल्यानंतर हा दरोडा आकाश दगडबा पवार व गणेश धर्मनाथ चव्हाण (दोघे रा. घाणेवाडी, ता. जालना) यांच्यासह अन्य पाच ते सहा जणांनी केल्याची कबुली दिली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने या तिघांना मंगळवारी (ता.१५) पकडले. त्यांच्याकडून ५७ हजार रुपयांचे दीड टन लोखंडी सळई व गुन्ह्यात वापरलेला ट्रॅक्टर, एक दुचाकी असा एकूण तीन लाख ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

 

ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी नागवे, कर्मचारी सॅम्युअल कांबले, प्रशांत देशमुख, गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे, कृष्णा तंगे, सागर बाविस्कर, मदन बहुरे, प्रशांत लोखंडे, सचिन चौधरी, संदीप मांटे, विलास चेके यांनी केली.

 

Edited - Ganesh Pitekar
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thieves Arrested For Stealing Jalna News