चौसाळ्यात चार ठिकाणी चोरट्यांचा धुडगूस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

बीड - बीड तालुक्‍यातील चौसाळा येथे चोरट्यांनी एकाच रात्री चार ठिकाणी धुडगूस घालत सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह हजारोंची रोकड लुटल्याचा प्रकार रविवारी (ता.२१) सकाळी उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.

चौसाळा (ता. बीड) येथील सराफा व्यापारी गोपाळ वेदपाठक हे लग्न सोहळ्यानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्याचा फायदा घेत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा एकूण २० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. त्याच भागातील बसचालक राजेश पवार हे कर्तव्यावर गेले असताना त्यांचे कुटुंब छतावर झोपले होते. त्याचा फायदा घेत चोरट्यांनी पवार यांच्या घरामध्ये प्रवेश करून तीस हजार रुपयांचे दागिने आणि दहा हजार रुपयांची रोकड लंपास केली. यानंतर चोरट्यांनी त्यांचा मोर्चा शेतकरी निवांतराव शिंदे यांच्या घराकडे वळविला. मुख्य प्रवेशद्वारासह आतील दरवाजाचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्यांचे कुटुंब जागे झाल्यानंतर आरडाओरड झाली. त्यामुळे चोरटे तेथून पळून गेले. त्यानंतर जीवनराव मस्के यांच्या घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. मात्र तिथे त्यांना काहीच मिळाले नाही. एकाच रात्री चार ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी रात्रीची गस्त सुरू करून पोलिस बंदोबस्त वाढवावा, अशी मागणी होत आहे.

Web Title: Thieves in four places