मानोलीत चोरट्यांचा धुमाकूळ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

लग्नाच्या निमित्ताने सोन्या-चांदीचे दागिने व कपडे घरात आणले होते. अज्ञात चोरट्यांनी या पेटीतील ठेवलेले पाच तोळे सोने आणि 20 हजार रुपये व दोन एटीएम कार्ड लंपास केली.

मानवत : येथून अवघ्या सहा किलोमीटर वर असलेल्या मानोली या गावातील काकडे गल्लीत अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला. या चोरट्यांनी पाच तोळे सोने, एटीएम आणि रोख 20 हजार रुपयांची रोकड लंपास केली. विशेष म्हणजे घरामध्ये चारजण असताना त्यांच्यावर गुंगीच्या औषध वापरुन ही चोरी केली असल्याचे उघड झाले आहे. तसेच चोरट्यांनी जाताजाता शेजारच्या घरी चोरी करुन पन्नास हजार रुपये लंपास केले. 

मानवत येथे भारतीय स्टेट बँकेतून पाच लाख रुपयांवर भर दिवसा चोरट्यांनी डल्ला मारला. या घटनेच्या पाठोपाठ मानोलीतही चोरीची घटना घडल्याने आता ग्रामीण भागातही चोरटे सक्रीय झाले असल्याची चर्चा होत आहे. ता. 8 एप्रिलला मध्यरात्रीनंतर 1 ते 2 वाजेच्या सुमारास मानोली येथील ग्रामपंचायत सदस्य दत्ता रामभाऊ मांडे यांच्या राहत्या घरी चोरट्यांनी धुमाकुळ घातला. मांडे यांच्या घरातील चारजण झोपेत असताना त्यांच्या तोंडावर गुंगीचे औषध टाकले. त्यामुळे चोरटे काय करत आहेत? याचा अंदाज अथवा आरडाओरड करता आली नाही.

लग्नांच्या निमित्ताने सोन्या-चांदीचे दागिने व कपडे घरात आणले होते. अज्ञात चोरट्यांनी या पेटीतील ठेवलेले पाच तोळे सोने आणि 20 हजार रुपये व दोन एटीएम कार्ड लंपास केली. सुमारे दोन ते अडीच लाख रुपयांचा ऐवेज लंपास केले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ही चोरी केल्यानंतर दत्ता मांडे यांच्या शेजारी असलेले विठ्ठल ज्ञानदेव मांडे यांच्या घरातील 50 हजार रुपये लंपास केले आहेत. या दोन्ही प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच श्वान पथकास पाचारणही करण्यात आले होते. श्वानपथकाने मानोली ते मानवत या जुन्या रस्त्यावरुन चोरटे गेले असल्याचा माग दाखविला आहे. चोरटे हे दुचाकी वाहनावरुन पसार झाले असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरु आहे. दरम्यान, या घटनेमुळे मानोलीसह मानवत परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Web Title: thieves in Manoli Manwath