जायकवाडी धरणात तेरा टक्के पाणीसाठा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

नाशिक जिल्ह्यातील गोदावरीला आलेल्या पुरामुळे पैठण येथील जायकवाडी धरणाच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. दरम्यान, धरणाचा एकूण पाणीसाठा 13 टक्के झाला आहे, अशी माहिती धरण सहायक अभियंता संदीप राठोड यांनी शुक्रवारी (ता. तीन) दिली. 

पैठण (जि. औरंगाबाद) - नाशिक जिल्ह्यातील गोदावरीला आलेल्या पुरामुळे पैठण येथील जायकवाडी धरणाच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. दरम्यान, धरणाचा एकूण पाणीसाठा 13 टक्के झाला आहे, अशी माहिती धरण सहायक अभियंता संदीप राठोड यांनी शुक्रवारी (ता. तीन) दिली. 

पुराच्या पाण्यामुळे नांदूर-मधमेश्वर येथील धरणातून एक लाख क्‍युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने रात्रीतून धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ होणार आहे. धरणावरील यंत्रणा सतर्क झाली आहे. धरणाची पाणी पातळी 1499.57  फूट, 457.07 मीटर आहे. पाण्याची आवक 45 हजार क्‍युसेक असून एकूण पाणीसाठा 989.886 दशलक्ष घनमीटर आहे. जिवंत पाणीसाठा 253.90 दशलक्ष घनमीटर आहे. नाशिक जिल्ह्यातील गोदावरीला आलेल्या पुरामुळे हे सर्व पाणी जायकवाडीच्या दिशेने झेपावले आहे. त्यामुळे आता धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ होणार आहे. पैठणकरांसाठी ही समाधान देणारी बाब आहे. पाणी पातळीत वाढ होत असल्याची माहिती नागरिक उत्सुकतेने घेत असून, आज दिवसभर हीच चर्चा सुरू होती. 

चार महिन्यांनंतर बंद झाले आपत्कालीन पंप 
औरंगाबाद :
नाशिक परिसरात होत असलेल्या पावसामुळे यंदा दुसऱ्यांदा गोदावरी नदीला पूर आला आहे. त्यामुळे नाथसागरात पाण्याचा ओघ वाढला असून, शनिवारी दुपारपर्यंत जिवंत पाणीसाठा 10.18 टक्‍क्‍यांवर गेला होता. त्यामुळे महापालिकेने चार महिने आठ दिवसांनंतर आपत्कालीन पंप बंद केले आहेत. दरम्यान, शहरात येणाऱ्या पाण्यातदेखील पाच एमएलडीने वाढ झाली आहे. 

नाथसागरातील मृत जलसाठ्यातून पाणी उपसा करवा लागल्याने महापालिकेस आपत्कालीन पंप सुरू केले होते. 26 जुलैपर्यंत नाथसागरात जिवंत पाणीसाठा नव्हता. काही दिवसांपासून नाशिक परिसरात जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असून अनेक धरणांतून गोदावरीत पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शनिवारी दुपारी नाथसागरातील जिवंत पाणीसाठा 10.18 टक्‍क्‍यांवर गेला होता. नाथसागरातील पाणीसाठा वाढत असल्याने शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे. महापालिकेने 22 मार्चपासून पाच फ्लोटिंग पंप सुरू केले होते. ते एक ऑगस्टला बंद केले आहेत. तसेच पाणी उपशात तब्बल पाच एमएलडी एवढी वाढ झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 
 
बंद रोहित्राची आज होणार दुरुस्ती 
चार दिवसांपूर्वी फारोळा येथील रोहित्र जळाल्याची घटना घडली होती; मात्र या रोहित्राची अद्याप दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे पाचपैकी एक पंप बंद आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत रोहित्राची दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर बंद पंप सुरू होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thirteen percent water storage in Jaikwadi dam