वीजबिल भरण्यासाठी तेरा हजार ग्राहकांकडून ॲपचा वापर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 एप्रिल 2017

बीड - महावितरण कंपनीने सुरू केलेल्या ऑनलाईन वीज भरणा प्रक्रियेस ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. घरबसल्या या सुविधेमुळे ग्राहकांच्याही वेळेची बचत होत आहे. जिल्ह्यात मार्च महिन्यात १३ हजार २३१ ग्राहकांनी ॲपद्वारे दोन कोटी ६१ लाख रुपयांचा वीज बिल भरणा केला आहे. 

बीड - महावितरण कंपनीने सुरू केलेल्या ऑनलाईन वीज भरणा प्रक्रियेस ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. घरबसल्या या सुविधेमुळे ग्राहकांच्याही वेळेची बचत होत आहे. जिल्ह्यात मार्च महिन्यात १३ हजार २३१ ग्राहकांनी ॲपद्वारे दोन कोटी ६१ लाख रुपयांचा वीज बिल भरणा केला आहे. 

पूर्वी वीज देयक भरण्यासाठी ग्राहकांना महावितरणच्या कार्यालयात किंवा महावितरणचे वीज बिल भरणा केंद्र असलेल्या पतसंस्था वा बॅंक शाखेत जाऊन रांगेत उभे राहावे लागे. ग्रामीण भागातील ग्राहकांना, तर यासाठी परगावी जाण्यासाठी वेळ आणि प्रवास खर्चही करावा लागे; पण आता महावितरण कंपनीने संगणकावर किंवा मोबाईल ॲपच्या मदतीने वीज बिल भरण्याची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या वेळेची आणि प्रवास खर्चाची बचत होऊन मनस्तापही थांबला आहे. यासाठी ग्राहकांना www.mahadiscom.in या संकेत स्थळावर जाऊन view / pay bill पर्यायावर ऑनलाईन वीज बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मोबाईल ॲप किंवा महावितरणच्या संकेत स्थळावर जाऊन ग्राहकांना चालू किंवा थकबाकीची देयकेही पाहण्याची सोय आहे. याद्वारे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बॅंकिंगद्वारे वीज बिल भरता येत आहे. 

ऑनलाईन वीज बिल भरल्यास संगणकीकृत पावतीही ग्राहकाला मिळते. महावितरणचे मोबाईल ॲप्लिकेशन मराठी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध असून ही सेवा २४ तास उपलब्ध आहे. त्यामुळे वीज ग्राहकाला आपले वीज बिल केव्हाही आणि कोठूनही भरता येते. 

दरम्यान, मार्च महिन्यात बीड जिल्ह्यातील १३ हजार २३१ ग्राहकांनी ऑनलाईन पद्धतीने दोन कोटी ६१ लाख रुपयांचा भरणा केला. ही सुविधा वापरण्यासाठी मोबाईल किंवा फोनवरून १८००२३३३४३५ किंवा १८००२००३४३५ या टोल फ्री क्रमांकावर फोनद्वारे या सुविधेची माहिती घेता येते.

वीजजोडणी भेटली नाही तर करा तक्रार
दरम्यान, अलीकडे ग्राहकांना नवीन जोडणीसाठी महावितरण कार्यालयात खेटे मारावे लागतात. शेती जोडणीसाठी तर शेतकऱ्यांची मोठी अडवणूक होते. त्यामुळे वीज जोडणी न मिळालेल्या ग्राहकांनी थेट फोनद्वारे तक्रार (०२२ - २६४७८९८९ किंवा ०२२ - २६४७८८९९) करावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

Web Title: thirteen thousand customers use app for electricity bill payment