दोघे सख्खे भाऊ, पक्के निर्लज्ज... बीडमध्ये तेरा वर्षांचे मुलीचे महिनाभर शोषण

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 March 2020

  • पेठ बीड ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद 
  • अपहरण करून एकाने केला महिनाभर अत्याचार 
  • अपहरणापूर्वीही दुसऱ्या भावाकडून शोषण

बीड - अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर एका भावाने दुचाकीवरून तिला वेगवेगळ्या शहरांत फिरवून अत्याचार केल्याचा प्रकार शहरातील पेठ बीड भागात समोर आला आहे. कहर म्हणजे याच आरोपीच्या भावाने अपहरणापूर्वी तिच्यावर अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. शहागड (जि. जालना) येथून मंगळवारी (ता. तीन) पीडित मुलीची सुटका करून आरोपींच्याही मुसक्या पोलिसांनी आवळल्या. याप्रकरणी बलात्कार व बाललैंगिक अत्याचाराचा स्वतंत्र गुन्हा नोंद करण्यात आला. 

शहरात आठवीच्या वर्गात शिकणारी साडेतेरा वर्षीय अल्पवयीन मुलगी जानेवारीअखेरीस गायब झाली. गल्लीत शेजारी राहणारा बापूराव शिवाजी झणझणे (२९, रा. खांडेपारगाव, ता. बीड) हादेखील गायब असल्याचे समोर आल्यानंतर पीडितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून त्याच्यावर २८ जानेवारीला पेठ बीड ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंद करण्यात आला. त्यात बापूराव झणझणेसह त्याचा भाऊ संतोष शिवाजी झणझणे व बापूरावची पत्नी रोहिणी बापूराव झणझणे यांचाही सहआरोपी म्हणून समावेश आहे. संतोष झणझणे व रोहिणी झणझणे या दीर-भावजयीला यापूर्वीच पोलिसांनी अटक केली होती. 

हेही वाचा - बापरे...फक्त खूनच नाही, तर जाळूनही टाकले

दरम्यान, विवाहित असलेल्या बापूराव झणझणेला दोन मुले आहेत. त्याने अल्पवयीन मुलीला मित्राच्या दुचाकीवरून (एमएच २१ जे ५१८८) पळवून नेले. पुणे, कात्रज, आळंदी, औरंगाबाद अशा वेगवेगळ्या शहरांत फिरून तिच्यावर महिनाभर अत्याचार केला. दरम्यान, संतोष झणझणे व रोहिणी बापूराव झणझणे हे आधीच पोलिसांच्या ताब्यात आहेत. बापूराव झणझणेला मंगळवारी (ता. तीन) न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यास सात मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पीडितेला बालन्यायालयाच्या परवानगीने सुधारगृहात ठेवण्यात आले. 

हेही वाचा - तुमचा विवाह कधी झालाय...बघा जमतेय का काही...

दरम्यान, बापूराव झणझणे याने दारूच्या नशेत मारहाणही केली. बापूराव झणझणे व पीडिता हे मोबाईल वापरत नसत. त्यामुळे पोलिसांना त्यांचा सुगावा लागत नव्हता. जवळचे पैसे संपल्याने तो तीन मार्चला बीडकडे निघाला. शहागडजवळ आल्यावर त्याची नजर चुकवून पीडितेने एका रसवंतीवाल्याच्या फोनवरून नातेवाइकाशी संपर्क केला. नातेवाइकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर सहायक निरीक्षक राजेंद्र बनकर, जमादार सुनील अलगट, राहुल गुरखुदे, गणेश जगताप यांनी शहागड गाठून बापूराव झणझणे यास बेड्या ठोकल्या. त्याच्याकडील दुचाकीही जप्त केली. 

हेही वाचा - शेतकरी म्हणतो, साहेब मी जिवंत....अधिकारी म्हणतात मेला

अपहरणापूर्वी भावाने केला अत्याचार 
पोलिसांनी चौकशी केल्यानंतर पीडितेने अपहरणानंतरची आपबीती सांगितली. त्यामुळे अपहरणाच्या गुन्ह्यात बलात्कार व बाललैंगिक अत्याचाराचे कलम वाढविण्यात आले. अपहरणापूर्वी संतोष झणझणे यानेही डिसेंबर २०१९ मध्ये वेळोवेळी अत्याचार केल्याचा दावा पीडितेने केला. त्यामुळे संतोषवर बलात्कार व बाललैंगिक अत्याचाराचा स्वतंत्र गुन्हा नोंद करण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thirteen-year-old girl raped in Beed