दिवसभरात उचलला तीस टन कचरा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 एप्रिल 2018

औरंगाबाद - शहरात अद्यापही जागोजागी कचरा साचलेला असल्याने प्रशासनाकडून कचरा उचलण्याचे काम सुरूच आहे. 

शनिवारी पहिल्या दिवशी २० टन कचरा मध्यवर्ती जकात नाक्‍यावर हलविण्यात आला, तर दुसऱ्या दिवशी रविवारी (ता. २२) कचरा उचलण्याच्या कामाला गती देण्यात आली. दिवसभरात शहागंज, मुकुंदवाडी, टाऊनहॉल, गांधीनगर येथील ३० टन कचरा उचलण्यात आल्याचा दावा करण्यात आला. शिवाय २० टन तयार खताचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले, तर आठ टन सुका कचरा पैठण रोडवरील कंपनीला देण्यात आल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख विक्रम मांडुरके यांनी दिली.

दहा दिवसांच्या आत रस्त्यावरील कचरा हटविण्यासाठी २१ कलमी कार्यक्रम राबविण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहे. त्यानुसार पाणीपुरवठा आणि अग्निशमन विभागाचे अधिकारी, कर्मचारी वगळता सर्व अधिकारी, कर्मचारी कामाला लागले आहेत. शाळेच्या शिक्षकांना व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवर जनजागृतीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ते घरोघरी जाऊन कचऱ्याचे वर्गीकरण, ओला-सुका वेगळा कचरा करणे याबद्दलची जनजागृती करीत आहेत. 

तीन प्रभागांत  कचराकोंडी कायम
शहराच्या प्रभाग एक ते तीनमध्ये रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. अजूनही या भागात कचराप्रश्‍न नियंत्रणात आलेला नाही. जागोजागी कचऱ्याची ढिगारे साचली असून, त्यावर प्रक्रिया करण्यासाठी पावडर व फवारणी केली आहे. आता या कचऱ्याचे खत तयार होत आहे. सिडको-हडको भागात तुरळक ठिकाणी कचरा साचलेला आहे. प्रभाग सात, आठ आणि नऊमध्येही कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. ११५ वॉर्डांपैकी ९० वॉर्डांत ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याचे खत तयार केले जात असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.

सुका कचरा घेण्याची  कंपन्यांची तयारी
आता उशिराने का होईना कंपन्यांनी पालिकेकडे सुका कचरा घेण्याची तयारी दर्शवली आहे. टाऊनहॉलमध्ये ठेवण्यात आलेला सहा टन आणि मुकुंदवाडीतील दोन टन सुका कचरा पैठण रोडवरील कंपनीला पाठविण्यात आला. गांधीनगरमधील पाच टन ओला कचरा प्रक्रिया करण्यासाठी मध्यवर्ती जकात नाका येथे हलविण्यात आला. झोन क्रमांक पाचमध्ये कचऱ्यापासून तयार झालेले १४ टन खत शेतकऱ्यांना वाटप केले जात असल्याचे मांडुरके यांनी सांगितले.

Web Title: Thirty tonnes of garbage picked up during the day