esakal | तीन कोरोना रुग्ण निघाल्याने जिंतूरकरांनी पाळला कडकडीत बंद...
sakal

बोलून बातमी शोधा

rasta

जिंतूर तालुक्यातील शेवडी गावात तीन कोरोना बाधित आढळल्याने शहरात येलदरीमार्गे विदर्भात जाणाऱ्या रस्त्यावरील शिवाजी महाराज चौकात पोलिस तैनात करण्यात आले आहेत. पळवाटांनी शहरात येणाऱ्या जाणाऱ्यांची जागोजागी पोलिस कसून चौकशी करत आहेत तर शहरातील मुख्य बाजारपेठेतील सतत गजबजणारे रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. 

तीन कोरोना रुग्ण निघाल्याने जिंतूरकरांनी पाळला कडकडीत बंद...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जिंतूर : तालुक्यातील शेवडी येथे गुरुवारी (ता.१४) रात्री तीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाने हे गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करून दक्षतेसाठी जिंतूर शहरात जमावबंदी व संचारबंदी लागू केली. त्यास विविध स्तरांतील नागरिक, व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने शुक्रवारी (ता.१५) सकाळपासूनच सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. पोलिस यंत्रणेने महत्वाच्या ठिकाणांहून चौकाचौकात बंदोबस्त तैनात केला. त्यामळे शहरातील सर्व रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता.

शहरापासून जवळच असलेल्या शेवडी येथे गुरुवारी (ता.१४) येथे तीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. त्याची जिल्हा प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन त्याच दिवशी मध्यरात्री हे गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करून जिंतूर नगरपरिषदेच्या हद्दीसह शहराच्या तीन किलोमीटर परिसरात रविवारी (ता.१६) मध्यरात्रीपर्यंत जमावबंदी व संचारबंदीचे आदेश निर्देशित केले. त्याची स्थानिक प्रशासनाने त्याचवेळी अंमलबजावणी करून तहसीलदार सुरेश शेजूळ, पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जयंत सोनवणे यांनी शेवडी येथे भेट देऊन गावाचे क्षेत्र प्रतिबंधित केले. 


हेही वाचा - सहा हजारांवर शेतकऱ्यांचा एक लाख क्विंटल कापूस खरेदी

चौकाचौकात पोलिस बंदोबस्त
प्रशासनाच्या आवाहनानुसार रुग्णालये, औषधी विक्रेते वगळता शहरातील भाजी मार्केटसह सर्वच प्रतिष्ठाने कडकडीत बंद होती. दक्षतेसाठी पोलिस यंत्रणेने शहराच्या हद्दीत, चौकाचौकात पोलिस बंदोबस्त तैनात केला. त्यामुळे गल्लीबोळासह शहरातील सर्व रस्त्यांवर सकाळपासून शुकशुकाट दिसत होता. दरम्यान, शुक्रवारी (ता.१५) विभागीय अधिकारी (सेलु) उमाकांत पारधी यांनी शेवडी येथे भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

हेही वाचा - सकाळ इम्पॅक्ट ; दोन जेसीबी कंत्राटदाराकडे सुपूर्द

संचारबंदीतून यांना सूट
संचारबंदीतून सर्व शासकीय कार्यालये त्यांचे कर्मचारी व त्यांची वाहने, सर्व शासकीय वाहने, सर्व शासकीय व खासगी दवाखाने, सर्व औषधी दुकाने व वैद्यकीय कर्मचारी, वैद्यकीय रुग्णालयातील कर्मचारी, अत्यावश्यक सेवेसाठी परवाने घेतलेली वाहने व व्यक्ती, वैद्यकीय आपत्काल व त्यासंबंधी सेवा, गॅस वितरक व गॅस सिलिंडर घरपोच देणारे वाहन व त्यावरील कर्मचारी, प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे संपादक व वार्ताहर तसेच प्रतिनिधी आणि वितरक, पेट्रोलपंप वितरक व कर्मचारी आणि त्यांची वाहने, दूध विक्रेत्यांना घरोघरी जाऊन सकाळी सहा ते नऊ या कालावधीत दूध विक्री करणे, खत वाहतूक त्यांचे गोदामे व दुकाने आणि त्यांच्यासाठी लागणारी वाहने व कामगार, राष्ट्रीयीकृत बँका केवळ रास्तभाव दुकानदारांकडून चलनाद्वारे पैसे भरणा करणे आदी व्यक्ती व समूहाला सूट राहील. संचारबंदीतून सूट दिलेल्या बाबीशिवाय संचारबदी लागू केलेल्या भागात इतर कोणतीही व्यक्ती व वाहने रस्त्याने, बाजारामध्ये, गल्लीमध्ये, घराबाहेर फिरताना आढळून आल्यास शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येईल आणि कारवाई करण्यात येईल.