बीड जिल्ह्यात बस-जीपच्या धडकेत तीन ठार; 15 जखमी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 25 December 2019

बीड जिल्ह्यातील केज तालुक्‍यात चंदनसावरगाव येथे बस व मालवाहू जीपची धडक झाली. यात तीन जण जागीच ठार झाले. अपघातात 15 जण जखमी झाले आहेत.

केज (जि. बीड) - एसटी महामंडळाची बस व मालवाहू पिकअप जीपची धडक होऊन तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता. 24) परिसरातील चंदनसावरगावजवळ घडली. अपघातात 15 जण जखमी झाले आहेत.

विजयालक्ष्मी बाळासाहेब देशमुख (वय 55 मोहखेड, ता. मुखेड, जि. नांदेड), अनिल मोतीलाल कवलकर (50, रा. उमरगा, जि. उस्मानाबाद), श्‍याम वसंत राजगीरवाड (37, रा. चेरा, ता. जळकोट, जि. उस्मानाबाद) अशी मृतांची नावे आहेत. जखमींवर केजच्या उपजिल्हा रुग्णालय व अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

हेही वाचा - फटाका तोंडात फोडला...अन असे घडले...

अहमदपूर-अहमदनगर महामार्गावर औरंगाबाद-मुखेड ही बस (एमएच-20, बीएल-3721) अंबाजोगाईच्या दिशेने जात होती. चंदनसावरगावजवळ कोंबड्यांची वाहतूक करणारे पिकअप वाहन (एमएच-23, डब्ल्यू-2174) समोरून येत होते. यावेळी पिकअपने बसला मधल्या भागात जोराची धडक दिली. यात बसमधील तीन प्रवासी जागीच ठार झाले, तर 15 जण जखमी झाले.

हेही वाचा - कॅब, एनआरसीसंदर्भातील आंदोलनाला यापुढे परवानगी नाही

दरम्यान, परिसरातील लोकांनी बसमधील प्रवाशांना बाहेर काढून तत्काळ केजच्या उपजिल्हा व अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल केले. भाजपचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी मदत केली. तर तहसीलदार दुलाजी मेंडके व युसूफवडगाव पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी भेट दिली. 

हेही वाचा - बीडचा सह्याद्री देवराई प्रकल्प महाराष्ट्रात पथदर्शी ठरेल - सयाजी शिंदे

जखमींवर उपचार सुरू 
अपघातात बालाजी मारुती घोडगे (वय 50 रा. जांब, ता. मुखेड), दत्ता रघुनाथ मोरे (35 रा. लातूर), विकास दास (40, रा. कोलकत्ता), डॉ. विष्णुपंत गायकवाड (30, हाळी हरंगूळ, ता. लातूर), डॉ. संतोष ज्ञानोबा गुणाले (30, रा. उदगीर), शीतल सुनील मायकर (25), अशोक बबन जाधव (40), अलफिया अझर सिद्दिकी (21, रा. अंबाजोगाई), शिवनाथ गायकवाड (35, रा. गेवराई), मीना अशोक जाधव (40, पाटोदा), सरूबाई राजगीरवाड (60, रा. चेरा, ता. जळकोट, जि. लातूर), देवानंद दत्तात्रय शिंदे (वाहक, वय 45, रा. गुंटूर, नांदेड) अशी जखमींची नावे आहेत. 

पतीच्या निधनानंतर पत्नीचाही मृत्यू 
मुखेड तालुक्‍यातील मोहखेड येथील विजयालक्ष्मी बाळासाहेब देशमुख यांच्या पतीचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे औरंगाबाद येथील भावाकडे काही दिवस राहण्यासाठी गेल्या होत्या. सकाळीच भावाने त्यांना बसमध्ये पाठवून दिले. अवघ्या सहा तासांनी त्यांना बहिणीच्या निधनाचीही बातमी समजली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three killed in bus-pickup vehicle accident; 15 injured