उदगीरात तीन टप्प्यांत होणार कोरोनाचे लसीकरण, प्रशिक्षण पूर्ण

युवराज धोतरे
Sunday, 3 January 2021

कोरोना संसर्गजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोविड प्रतिबंधक लसीकरण तीन टप्प्यांत होणार आहे.

उदगीर (जि.लातूर) : कोरोना संसर्गजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोविड प्रतिबंधक लसीकरण तीन टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्यात खासगी व शासकीय डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांचे  लसीकरण होणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत कापसे यांनी दिली आहे. उदगीर येथील पन्नास डॉक्टर व दीडशे आरोग्य कर्मचाऱ्यांचे कोरोना लस देण्यासंदर्भातील प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर ती देण्यासाठी आवश्यक असणारी सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात शासकीय यंत्रणेतील व खासगी क्षेत्रातील डॉक्टर व आरोग्य कर्मचारी अशा एकूण दोन हजार दोनशे जणांना ही लस देण्यात येणार असल्याचे डॉ.कापसे यांनी सांगितले.

 

 

 
 
 

या पहिल्या टप्प्यातील लाभधारकांना ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. पहिल्या टप्प्याचे लसीकरण येथील सामान्य रुग्णालयात होणार आहे. एका लसीकरण मोहिमेत शंभर जणांना लस देण्यात येणार आहे. एका आठवड्यात सहा लसीकरण मोहिम घेण्यात येणार आहेत. चार आठवड्यामध्ये पहिल्या टप्प्याचे लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर महिनाभरा नंतर पहिल्या टप्प्याच्या लसीची दुसरी पूरक लस देण्यात येणार आहे. याच पद्धतीने हे लसीकरण पूर्ण करण्यात येणार असल्याचे डो.कापसे यांनी सांगितले.

जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सतीश हरिदास, सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दत्ता पवार, कोविड रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ.शशिकांत देशपांडे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.कापसे हे कोरोना लसीकरण मोहिमेचे नेतृत्व करित आहेत. तीन टप्प्यात उदगीर शहर व तालुक्यातील सर्व गावांमध्ये अँटी कोरोना लसीकरण मोहीम राबवून ही लस देण्यात येणार आहे. यासाठी वेगवेगळ्या विविध आरोग्य विभागाच्या टीम तयार करण्यात आले असून त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.

 

 

 

दुसऱ्या टप्प्यात लोकसेवक
दुसऱ्या टप्प्यामध्ये शहर व परिसरातील शासकीय सेवेत असणारे कर्मचारी, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद व शासनाच्या विविध विभागांतर्गत लोकसेवा करणारे कर्मचारी यांना ही लस देण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्प्यात पन्नास वर्षांच्या वरील व्यक्ती व शासनाने त्या-त्या वेळी निर्गमित केलेल्या नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर लस देण्यात येणार आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three Level Corona Vaccination In Udgir, Training Complete Latur News