पाच हजारांची लाच घेताना तीन पोलिस अटकेत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

  • बीड जिल्ह्यातील प्रकरण
  • दारूविक्रेत्याकडे लाचेची मागणी 
  • जामीन मिळवून देण्याचे आमिष

शिरूर कासार (जि. बीड) - अवैध दारूविक्रेत्याकडून चॅप्टर केसमध्ये जामीन मिळवून देण्यासाठी आणि अवैध दारूविक्री सुरू ठेवण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना तीन पोलिस कर्मचारी गुरुवारी (ता. 28) रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पोलिस ठाणे आवारात ही कारवाई केली. 

गोमळवाडा येथील अवैध दारूविक्रेत्यावर यापूर्वीची एक चॅप्टर केस होती. तर, अवैध दारूविक्रीसाठी हप्ता म्हणून सहायक फौजदार अशोक योगिराज शिंदे, पोलिस हवालदार अजिनाथ बाबासाहेब गर्जे व पोलिस शिपाई नारायण राजेंद्र सरवदे यांनी पाच हजार रुपयांची मागणी केली. याबाबत संबंधिताने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

हेही वाचा लग्नातून परतणारा युवक परळीजवळ ठार, दोघे गंभीर

शिरूर पोलिस ठाणे आवारात लाच देण्याचे ठरले. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केल्यानंतर लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्याने गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. दारूविक्रेत्याकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना अशोक शिंदे, अजिनाथ गर्जे व नारायण सरवदे या तिघांना पकडण्यात आले.

हेही वाचा प्रेमी युगुलास आठ तासात पकडले

कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील, पोलिस निरीक्षक राजकुमार पाडवी, पोलिस नाईक श्री. बागलाने, श्री. गदळे, श्री. घोलप, श्री. वीर, श्री. गारदे, चालक श्री. सय्यद, श्री. म्हेत्रे यांनी सहभाग घेतला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three policemen arrested for taking bribe