उदगीर तालुक्यात बारावीच्या परीक्षा केंद्रावर वर्ग दोन अन् पथक तीन

उदगीर तालुक्यात बारावीच्या परीक्षा केंद्रावर वर्ग दोन अन् पथक तीन

उदगीर (जि.लातूर) ः सध्या शहरासह तालुक्यातील एकूण बारा परीक्षा केंद्रांवर बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. शुक्रवारी (ता.२८) गणिताच्या पेपरला वाढवणा (बु) (ता.उदगीर) येथील यशवंत उच्च माध्यमिक परीक्षा केंद्रावर वर्ग दोन अन् भरारी पथके तीन अशी परिस्थिती निर्माण झाली. पथकातील एकूण दहा जणांच्या उपस्थितीत अकरा ते दोनपर्यंत परीक्षा पार पडल्या.


उदगीर शहरातील हावगीस्वामी महाविद्यालय परीक्षा केंद्रावर (३८७ ), शिवाजी महाविद्यालय परीक्षा केंद्रावर (१९७), महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय परीक्षा केंद्रावर (२७३ ) परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. शिवाय ग्रामीण भागातील उद्देश्वर उच्च माध्यमिक विद्यालय, सावरगाव (ता. देवणी) परीक्षा केंद्रावर (१०३), लोनेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय लोणी (५), यशवंत उच्च माध्यमिक विद्यालय वाढवणा (५८), पंडित जवाहरलाल नेहरू उच्च माध्यमिक विद्यालय तोगरी (२१०), गंगाधरराव साकोळकर पाटील उच्च माध्यमिक विद्यालय देवर्जन (६९), शंकर उच्च माध्यमिक विद्यालय बोरताळा तांडा (११५), चंगळामाता उच्च माध्यमिक विद्यालय जानापूर (९७), नरसामाता उच्च माध्यमिक विद्यालय नावंदी (७२), तर समर्थ उच्च माध्यमिक विद्यालय एकुरका रोड (४६) असे एकूण एक हजार ६३२ परीक्षार्थीनी परीक्षा दिली असल्याची माहिती सहायक परिरक्षक बालाजी धमनसुरे यांनी दिली आहे.


शुक्रवारी गणिताचा व विज्ञान शाखेचा अतिशय महत्त्वाचा पेपर असल्याने या परीक्षेत मास कॉपी होण्याचे प्रकार घडत असतात याची दखल घेऊन शिक्षण विभागाने परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी पाऊल उचलायला हवे होते. मात्र उदगीर तालुक्यातील बारा केंद्रांपैकी एकाच वाढवणा परीक्षा केंद्रावर तीन पथक गेल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. बारा परीक्षा केंद्रावर गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचे बारा पथके नियुक्त करण्यात आली होती. शिवाय तालुक्यातील तोगरी व नावंदी परीक्षा केंद्रावर जिल्हा पथके गेली होती. वाढवणा परीक्षा केंद्रावर बैठे पथक, जिल्हाधिकाऱ्यांचे भरारी पथक व शिक्षण विभागाचे भरारी पथक अशी तीन पथकाचे एकूण दहा अधिकारी तीन तास बसून होते. एकाच परीक्षा केंद्रावर तीन पथके असल्याने इतर परीक्षा केंद्र वाऱ्यावर सोडले गेल्याची चर्चा पालक वर्गात होत आहे.


उदगीरच्या बारा परीक्षा केंद्रावर घेण्यात येत असलेल्या बारावी परीक्षेत गोंधळाची परिस्थिती असल्याचे दिसून येत आहे. कोणते पथक कुठे जायचे? याचे योग्य नियोजन नसल्याचे यावरून दिसून येते. त्यामुळे सामूहिक कॉपी करणाऱ्या शाळांना या गैरनियोजनामुळे कॉपी करण्याची संधी मिळू शकते असे पालकांचे मत आहे. त्यामुळे यापुढील काळात तरी या पथकांना शिस्त लागेल का? अशी पालक वर्गात चर्चा आहे.

विद्यार्थी जास्त असतानाही शहराकडे दुर्लक्ष
उदगीर शहरातील तीन परीक्षा केंद्रांवर शुक्रवारी (ता.२८) झालेल्या गणित विषयाच्या पेपरला ८५७ एवढे विद्यार्थी परीक्षा दिले देत असतानाही शहरातील परीक्षा केंद्राकडे या पथकाचे दुर्लक्ष का? याची जोरदार चर्चा चालू आहे. बारा परीक्षा केंद्रातील एकूण १६३२ जणांपैकी ५० टक्‍क्‍यांच्या वर विद्यार्थ्यांनी शहरातील केंद्रावर परीक्षा दिली. मात्र हे भरारी पथक शहरातील परीक्षा केंद्राकडे फिरकले नाहीत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com