जालना जिल्ह्यात तीन ठिकाणी चोरी, एक लाखांसह ४० हजार रुपयांच्या सोन्याची पोत लंपास

विशाल अस्वार
Tuesday, 17 November 2020

वालसावंगी येथे सोमवारी (ता.१६) मध्यरात्री ऐन भाऊबीजच्या रात्री गावात तीन ठिकाणी चोरी, तर दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न करण्यात आला. येथील वसंत बेराड यांच्या राहत्या घरी रात्री दीडच्या सुमारास चोरट्यांनी घर फोडून जवळपास तीस हजार रुपयांची चोरी केली.

वालसावंगी (जि.जालना) : वालसावंगी येथे सोमवारी (ता.१६) मध्यरात्री ऐन भाऊबीजच्या रात्री गावात तीन ठिकाणी चोरी, तर दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न करण्यात आला. येथील वसंत बेराड यांच्या राहत्या घरी रात्री दीडच्या सुमारास चोरट्यांनी घर फोडून जवळपास तीस हजार रुपयांची चोरी केली. नंतर माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरराव भुते यांचे रात्री दोनच्या सुमारास चोरट्यांनी घर फोडून जवळजवळ चाळीस ते पन्नास हजार रुपये लंपास केले.

नंतर रात्री पुन्हा अडीचच्या सुमारास विष्णू दळवी यांचे घर फोडून चोरट्यांनी पंचवीस हजार रोख व त्यांच्या आईची चाळीस हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत लंपास केली. येथील सोनार गणेश बाविस्कर यांचे घर व प्रकाश धामोने यांचे दुकान फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. दरम्यान रात्री चोर आल्याची बातमी गावभर पसरली. रात्रीच पारध पोलिसांनी गावात रात्रभर शोधमोहीम राबविली. ग्रामस्थ देखील चोरांचा शोध होते. मात्र अंधारात चोरटे पसार झाले. दरम्यान चोरीच्या घटनांनी ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बिबट्याच्या हल्ल्‍यात पिता-पुत्र ठार, पैठण तालूक्यातील आपेगाव शिवारात दहशत  

चोरी करण्यासाठी गिरमिटचा वापर
तिन्ही ठिकाणी चोरट्यांनी दरवाजाची कडी उघडण्यासाठी गिरमिटचा वापर केला. या यंत्राद्वारे त्यांनी दरवाजाला होल करत दरवाजे उघडून आत घरात प्रवेश केला, तर दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न करताना कुलूप तोडण्यासाठी त्यांनी लोखंडी टॉमीचा वापर केला. शिवाय या चोरांकडे धारदार शस्त्र देखील असल्याचे कळते.

चोरट्यांचा केला पाठलाग
दरम्यान येथील माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर भुते यांच्या घरात चोरी केल्यानंतर बाहेर जाताना शंकर भुते यांना जाग आली. त्यांनी आरडाओरडा करत चोरांचा पाठलाग केला. मागे कुणीतरी येत असल्याचे बघून चोर पळाले. शंकर भुते हे देखील ओरडत चोरट्यांच्या मागावर पळत होते. या वेळी चोरट्यांनी त्यांच्या दिशेने खाली पडलेली दगडे फेकली. यामुळे ते जखमी झाले. पोटावर व पायांवर दुखापत झाली. या दरम्यान चोरटे मात्र पसार झाले. शिवाय विष्णू दळवी यांच्या घरी चोरी करत असताना लोखंडी साहित्याचा दाख दाखवत त्यांनी चोरी केली.

बरमुडा गॅंग असल्याचा संशय
काही दिवसांपूर्वी येथून जवळच असलेल्या धामणगाव(ता.बुलडाणा) चोरट्यांनी अनेक ठिकाणी घर फोडी केली होती. या दरम्यान त्यांचा पेहराव तोंडावर रुमाल व खाली बरमुडा पॅन्ट असा होता.येथेही यांचा पेहराव असाच असल्याने गावात बरमुडा गॅंग सक्रिय झाल्याची चर्चा आहे. यामध्ये दहापेक्षा अधिक चोर असून मोठी गॅंग आहे. दरम्यान या गँगचा बंदोबस्त करण्याचे कठीण आव्हान पोलिसांसमोर आहे.

ग्रामस्थांनी घाबरु नये
पारध पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रमेश जायभाय म्हणाले की,  ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये. रात्री झोपताना बाहेरचे वीजेचे दिवे सुरू ठेवावे. घरात दागिने, रोख गरज नसल्यास ठेवू नये. सीसीटीव्ही रात्रीच्या वेळी नेहमी सुरू ठेवावे. अनोळखी संशयास्पद व्यक्ती गावात वावरताना दिसल्यास तात्काळ संपर्क करावा. गावात पोलिसांची बारीक नजर असून लवकरच चोरांना जेरबंद करण्यात येईल.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three Stealing Incidents In Jalna District