मराठवाड्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, तीन महिला जखमी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 10 October 2020

मराठवाड्यात शनिवारी (ता.१०) वीज पडून तिघांचा, तर तीन महिला जखमी झाल्याच्या घटना घडल्या.

औरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता.१०) वीज पडून तिघांचा, तर तीन महिला जखमी झाल्याच्या घटना घडल्या. जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील आनंदगाव शिवारात शनिवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला. तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. तसेच अंबड शहरालगत असलेल्या पारनेर तांडा येथे महिला शेतमजूर व तिच्या मुलीच्या अंगावर वीज पडून जखमी झाल्याची घटना शनिवारी (ता.दहा) घडली आहे. महिला शेतमजूर संगीता रोहिदास चव्हाण (वय ४०) व मुलगी वैष्णवी रोहिदास चव्हाण (वय १८) असे जखमी मायलेकींचे नाव आहेत.

कोरोना लसीकरणासाठी कृती आराखडा पाठवा, औरंगाबाद महापालिकेला शासनाने दिले आदेश

आष्टी परिसरात शनिव ढगाळ वातावरण होते. दरम्यान दुपारी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. पाऊस सुरू असताना परतूर तालुक्यातील आनंदगाव शिवारातील शेतात तीन महिला कापूस वेचत असताना पाऊस आल्याने तेथील लिंबाच्या झाडाखाली दोन महिलांनी आसरा घेतला. तर अन्य एक महिला बैलगाडीखाली आडोशाला थांबली. दरम्यान विजांचा कडकडाट सुरू असतानाच या लिंबाच्या झाडावर वीज पडल्याने सूर्यकांता गोरखनाथ गायके (वय ४०) व मथुरा गणेश काळे (वय ४२) या जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी जालना येथे घेऊन जात असताना सूर्यकांता गायके यांचा वाटेतच मृत्यू झाला. तर मथुरा काळे यांच्यावर उपचार सुरू आहेत.

बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील पाडळी शिवारात शनिवारी (ता.१०) दुपारी चारच्या दरम्यान शेतामध्ये काम करताना वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तालुक्यातील बावी येथील रहिवासी असलेले शेतकरी आजिनाथ सदाशिव खेडकर (वय ४५) यांची पाडळी शिवारात साडेसात एकर शेतजमीन आहे. शेतात काम करताना शनिवारी दुपारी विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. यात वीज पडून खेडकर यांचा मृत्यू झाला. तलाठी आर. एस. बांगर, बी. सी. टाक यांनी घटनास्थळी तत्काळ भेट देऊन पंचनामा केला. खेडकर यांच्या मागे पत्नी, मुलगी, आई, वडील असा परिवार आहे. जिल्ह्यातील केज तालुक्यातील हदगाव येथे वीज पडल्याने एका शेतकरी तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. १०) शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.

लातूरहून पुणे, मुंबई, हैदराबादलाही आता बससेवा

झुंबरलाल शिवाजी हांगे (वय ३५) असे मृताचे नाव आहे. तालुक्यात शनिवारी सायंकाळच्या सुमारास मेघ गर्जनेसह पावसाने जोरदार हजेरी लावली. यावेळी हदगाव शिवारातही पावसाने हजेरी लावल्याने झुंबरलाल हे सायंकाळी पाचच्या सुमारास पाऊस झाल्याने शेतातून घराकडे परतत होते. भोपला हदगाव रस्त्यावरील पुलाजवळ आला असताना त्यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती नायब तहसीलदार सचिन देशपांडे यांनी दिली. त्यांचे गावात किराणा दुकान आहे. सध्या शेतात कामे असल्याने ते शेतात काम करून घराकडे परतत होते.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thunder Storm Kills Three People In Marathwada