खुल्या गटात तिकिटासाठी धावाधाव

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 जानेवारी 2017

घनसावंगी - तालुक्‍यात जिल्हा परिषदेचे आठपैकी सात गट खुले झाले आहेत. त्यातील दोन महिलांसाठी राखीव आहेत. परिणामी खुल्या गटातील इच्छुकांची संख्या पाहता उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणावर स्पर्धा होणार असल्याचे चित्र आहे. 

घनसावंगी - तालुक्‍यात जिल्हा परिषदेचे आठपैकी सात गट खुले झाले आहेत. त्यातील दोन महिलांसाठी राखीव आहेत. परिणामी खुल्या गटातील इच्छुकांची संख्या पाहता उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणावर स्पर्धा होणार असल्याचे चित्र आहे. 

तालुक्‍यात पूर्वी सात जिल्हा परिषदेचे गट होते. त्यातच घनसावंगी शहरास नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्याने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पुनर्रचनेत घनसावंगी शहर वगळून गुरुपिंपरी, पारडगाव गट रद्द होऊन राणीउंचेगाव, नव्याने पिंपरखेड गट, तर पूर्वीचे कुंभार पिंपळगाव, अंतरवाली टेंभी, तीर्थपुरी, रांजणी, मच्छिंद्रनाथ चिंचोली हे गट आहेत. तर पंचायत समितीचे अठरा गण निर्माण झाले आहेत.  यातील तीर्थपुरी, रांजणी, कुंभार पिंपळगाव, अंतरवाली टेंभी, पिंपरखेड बुद्रूक हे पुरुषांकरिता, तर राणीउंचेगाव, गुरुपिंपरी हे गट सर्वसाधारण महिलेकरिता व मच्छिंद्रनाथ चिंचोली हा एकमेव गट इतर मागासवर्गीय महिलेकरिता राखीव झाला आहे. मच्छिंद्रनाथ चिंचोली वगळता सर्वच गटांत इच्छुक उमेदवारांची संख्या सर्वच पक्षांत जास्तीची दिसून येत आहे. 

पंचायत समितीच्या गणामध्ये राणीउंचेगाव, साकळगाव, जांबसमर्थ, तीर्थपुरी, पिंपरखेड सर्वसाधारण प्रवर्गासाठी, तर रांजणी, पारडगाव, वडीरामसगाव, बाणेगाव, अंतरवाली टेंभी सर्वसाधारण महिलेकरिता, पानेवाडी, कुंभार पिंपळगाव नागरिकांचा मागासप्रवर्ग, तर मंगुजळगाव, गुरुपिंपरी नागरिकांचा मागासप्रवर्ग महिला, मच्छिंद्रनाथ चिंचोली गण अनुसूचित जाती महिला, राजाटाकळी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. 

दरम्यान, हे आरक्षण निश्‍चित झाल्यापासून इच्छुकांनी आपल्या नेत्यांकडे उमेदवारीचे साकडे घातले गेले; तसेच सर्कलमध्ये चाचपणीदेखील केली गेली. गावातील कार्यक्रमास उपस्थित राहून सुख-दुःखात सहभागी होण्याबरोबर वैयक्तिक मतदार, नातेवाईक यांचा संपर्क करण्याचा प्रयत्न सर्वच इच्छुक उमेदवारांनी केला असून निवडणुकीचे बिगुल प्रशासनाकडून जाहीर होताच आपली उमेदवारी निश्‍चित असून, गावागावांत या निवडणुकीने वातावरण चांगलेच तापले आहे. तालुक्‍यात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप स्वबळाच्या दृष्टीने तयारीही करीत आहेत. 

तीनही पक्षांकडून संभाव्य उमेदवार निश्‍चित असल्याचे बोलले जात आहे; तसेच काँग्रेस व राष्ट्रीय समाज पक्ष, भारतीय रिपब्लिकन बहुजन महासंघ, संभाजी ब्रिगेड, शिवसंग्राम हे स्वतंत्रपणे मैदानात उतरण्याच्या तयारीत असून निवडणुकीचा कार्यक्रम जसजसा जवळ येईल त्यानुसार राजकीय चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.

Web Title: ticket movement for open group