
वांझोळा व देवठाणा गावात गारपिटीने कांद्याचे पीक आडवे झाले आहे. या पिकाची दांडी मोडल्यावर ते कोणत्याच कामी येत नाही. गारांच्या माऱ्याने पीक भुईसपाट झाले असून पन्नास एकरांवरील मोठे नुकसान झाले आहे. पिकांचे झालेल्या नुकसानीची दखल घेऊन शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
हिंगोली : हिंगोली शहरासह तालुक्यातील काही गावांत शनिवारी (ता. २८) सायंकाळी अवकाळी पाऊस झाला. रात्री आठच्या दरम्यान वांझोळा व देवठाणा भागात गारपीट झाली. यामुळे गावातील पन्नास एकरांवर असलेले कांदा बीजोत्पादनाचे पीक भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
हिंगोली शहरासह तालुक्यातील काही गावांत शनिवारी पाऊस झाला. तसेच वांझोळा व देवठाणा गावात गारपीट झाली. या दोन्हीही गावांत मिळून पन्नास शेतकऱ्यांनी पन्नास एकरांवर कांद्याचे बीजोत्पादन घेतले आहे. नोव्हेंबर महिन्यात लागवड केली होती. या पिकाची (ता. १५) एप्रिलपासून शेतकरी काढणी करणार होते. मात्र, गारपिटीने हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. मागच्या वर्षी २८ हजार रुपये क्विंटलचा भाव बीजोत्पादानाला मिळाला होता.
हेही वाचा - हिंगोलीत चिमुकले बैठे खेळात व्यस्त
३३ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव
दरवर्षी शेतकरी एका कपंनीला त्याची विक्री करतात. त्याचा भावदेखील अगोदरच ठरला जातो. या वर्षी ३३ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव ठरल्याचे शेतकरी सांगत आहेत. मात्र, गारपिटीने कांद्याचे पीक आडवे झाले आहे. या पिकाची दांडी मोडल्यावर ते कोणत्याच कामी येत नाही. गारांच्या माऱ्याने पीक भुईसपाट झाले असून पन्नास एकरांवरील मोठे नुकसान झाले आहे.
आर्थिक अडचणी वाढल्या
अनेक वर्षांपासून कांदा बीजोत्पादन घेत आहे. दरवर्षी क्षेत्र वाढवितो. या वर्षीदेखील क्षेत्र वाढविले आहे. पंधरा एप्रिलपासून बीजांची काढणी सुरू करावयाची होती. मात्र, त्यापूर्वीच गारपिटीने पिकाचे नुकसान झाल्याने आता आर्थिक अडचणी वाढल्या आहेत.
-रामेश्वर गावंडे, शेतकरी, वांझोळा
संत्रा बागेचे नुकसान
हिंगोली ः सेनगाव तालुक्यातील वायाचाळ पिंपरी येथे तीन-चार दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. संत्र्यांच्या झाडांखाली सडा पडल्याचे पाहावयास मिळत आहे. विठ्ठल कोंघे यांचा दोन एकर संत्र्याचा मळा असून वारे व अवकाळी पावसाने विक्रीला आलेले संत्री गळून पडली आहेत.त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे खाली पडलेली संत्री विकता येईनाशी झाली.
येथे क्लिक करा - शेकडो क्विंटल टरबूज शेतात पडून
पेरणीसाठी केलेला खर्चही निघणे अवघड
जिल्हाभरात मागील आठवड्यात तीन वेळा अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसासह जोराचा वाराही सुटत असल्याने पिके आडवी पडत आहेत. याशिवाय काही भागात गारपीटही झाली. त्यामुळे हातातोंडाशी आलेली पिके हातची गेली. पिकांची स्थिती पाहता शेतकऱ्यांनी पेरणीसाठी केलेला खर्चही निघणे अवघड झाले आहे. पिकांचे झालेल्या नुकसानीची दखल घेऊन शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.