जालन्यात कोरोना बळींची संख्या झाली तीस 

महेश गायकवाड
बुधवार, 8 जुलै 2020

कोविड हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचाराखाली असलेल्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण कोरोनाबळींचा आकडा तीस इतका झाला आहे. दरम्यान, मंगळवारी (ता. सात) तेरा संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर २३ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 

जालना - कोविड हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचाराखाली असलेल्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण कोरोनाबळींचा आकडा तीस इतका झाला आहे. दरम्यान, मंगळवारी (ता. सात) तेरा संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर २३ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 

गेल्या तीन दिवसांत कोरोनाबाधित आठ रुग्णांचा मृत्यू झाला. तर आता बाधितांचा आकडा आठशेवर गेला आहे. दरम्यान, मंगळवारी समोर आलेल्या दोन रुग्णांमध्ये जालना शहरातील गणपती गल्ली परिसरातील साठवर्षीय पुरुषाचा समावेश आहे. हा रुग्ण न्यूमोनिया व रक्तपेशीच्या कर्करोगाने ग्रस्‍त होता. ता. ४ जुलै रोजी त्यास जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू असताना रविवारी (ता.पाच) दुपारी या रुग्णाचा मृत्यू झाला. त्याचा अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आला आहे. तर दुसरा शहरातील श्रीनगरमधील ५७ वर्षीय महिला असून, तीसुद्धा न्यूमोनिया, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या आजाराने ग्रस्‍त होती. या महिलेला ता. ४ जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना मंगळवारी मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली आहे.

हेही वाचा : कोरोनाबाधिताच्या अंत्यविधीला तब्बल शंभर जण

दरम्यान, जिल्हा रुग्णालयातर्फे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या १८१ नमुन्यांपैकी ६७ अहवाल प्राप्त झाले. तर १२७ संशयितांचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. दिवसभरात १३ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, यात सर्वाधिक रुग्ण जालना शहरातील आहेत. यामध्ये शेरसवारनगर, मिशन हॉस्पिटल क्वार्टर परिसर, मस्‍तगड व जेईएस कॉलेजमध्ये अलगीकरणातील प्रत्येकी एक, जांगडानगर व नळगल्लीतील प्रत्येकी दोन, कॉलेज रोड परिसरातील तीन व्यक्तींचा समावेश आहे; तसेच जालना तालुक्यातील मानदेऊळगाव येथील एक व बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८१३ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. त्यापैकी ४८८ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या रुग्णालयात २९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी २९ रुग्णांवर औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

हेही वाचा : पीककर्जावर शेतकऱ्यांची मदार

कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी शहरातील २३ रुग्ण मंगळवारी बरे झाले. यामध्ये जालना शहरातील सदर बाजार, जेपीसी बँक कॉलनी, मंगळ बाजार, मिशन हॉस्पिटल रोड, आर.पी. रोड, संभाजीनगर, नाथबाबा गल्ली व जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रत्येकी एक, वसुंधरानगर, दानाबाजार, रहेमानगंज, बरवार गल्ली व मस्‍तगडमधील प्रत्येकी तीन व्यक्तींचा समावेश आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Total thirty corona patients died in Jalna district