अजिंठा लेणीवर पर्यटकांचा बहिष्कार 

संकेत कुलकर्णी
बुधवार, 19 जून 2019

"भारतात गेलात, तर अजिंठा लेणी जरूर पाहा,' असं एकेकाळी पर्यटकांना सांगणारे देश आता "अजिंठ्याला जाऊ नका, रस्ता खराब आहे. औरंगाबादला जाऊ नका, विमानसेवा पुरेशी नाही,' असे सांगू लागले आहेत.

औरंगाबाद - "भारतात गेलात, तर अजिंठा लेणी जरूर पाहा,' असं एकेकाळी पर्यटकांना सांगणारे देश आता "अजिंठ्याला जाऊ नका, रस्ता खराब आहे. औरंगाबादला जाऊ नका, विमानसेवा पुरेशी नाही,' असे सांगू लागले आहेत. उन्हाचे कारण सांगितले जात असले, तरी औरंगाबाद-जळगाव महामार्गाच्या चौपदरीकरणाचे आठ ते दहा महिन्यांपासून रखडलेले काम आणि "जेट'ची विमानसेवा बंद पडल्यामुळे "एअर इंडिया'चे वाढलेले तिकीटदर हेच याचे मुख्य कारण असल्याचे दिसून येत आहे. 

चौपदरीकरणाच्या कामासाठी इथून-तिथून सगळाच खोदून ठेवलेला औरंगाबाद-जळगाव महामार्ग प्रवासासाठी अतिशय धोकादायक बनला आहे. अनेक ठिकाणी एकेरी वाहतुकीमुळे कोंडी होऊन पाच-पाच तास प्रवाशांचा खोळंबा होत आहे. धुळीमुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्‍यात आले आहेच; पण धडधडीमुळे वाहनांचे सस्पेन्शन खराब झाल्याच्याही तक्रारी लोकांनी केल्या आहेत. कित्येक प्रवाशांनी सोशल मीडियावरही छायाचित्रे, व्हिडिओ टाकून हा मुद्दा लावून धरला. मात्र, तांत्रिक बाबींत अडकलेला निधी काही शासनाच्या हातून सुटला नाही. 

पर्यटकांची ओसरली संख्या  
अजिंठा लेणीला दिवसाकाठी सरासरी दोन ते अडीच हजार देशी-विदेशी पर्यटक भेट देतात. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून हा आकडा घसरत चालला आहे. पुरातत्त्व विभागाचे अधिकारी उन्हाचे कारण देतात. ते काहीअंशी खरेही आहे. विदेशी पर्यटकांचा ओढा मे महिन्यात अजिंठ्याकडे राहत नाही. मात्र, यावेळी फेब्रुवारीपासून हा आकडा इतर वर्षांच्या तुलनेत चांगलाच घसरला आहे. देशी पर्यटकांचाही आकडा गेल्या दोन वर्षांत अनुक्रमे 21 हजार आणि 23 हजार असा असताना, यंदा मात्र एप्रिल महिन्यात चक्क 9 हजारांवर आला. मेमध्ये तो केवळ 14 हजारांवरच थांबला. विदेशी पर्यटक तर महिनाभरात केवळ 550 इतकेच आले. 

वेरूळकडे वळाल्या गाड्या 
अजिंठ्याला जाण्यासाठी नाराज असलेल्या पर्यटकांनी गाड्या वेरूळ आणि दौलताबादकडे वळविल्या. त्याचा पुरातत्त्व विभागाच्या उत्पन्नात चांगला फरक दिसून आला. मे महिन्यात 14 हजार 957 देशी आणि 550 विदेशी पर्यटकांनी अजिंठ्याला भेट दिली. त्यांच्या तिकिटातून पुरातत्त्व विभागाला केवळ 8 लाख 77 हजार 840 रुपये मिळाले. तुलनेत याच महिन्यात वेरूळला तब्बल 96 हजार 606 पर्यटकांनी 42 लाख 28 हजार 440 रुपयांची तिकीट खरेदी केली. बिबी-का-मकबऱ्यालाही या महिन्यात 91 हजार 126 पर्यटकांच्या तिकिटातून 23 लाख 94 हजार 680 रुपये मिळाले. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत हा फरक लक्षणीय असल्याचे दिसून आले. 

थायलंडचे राजदूत म्हणतात... 
अजिंठ्याबद्दल विशेष आकर्षण असणाऱ्या थायलंडचे भारतातील राजदूत चतिंतर्न गोंगसाकडी यांनी पर्यटकांच्या तक्रारी आणि स्वानुभवावरून अजिंठ्याच्या समस्यांबाबत ट्‌विटरवर जाहीर कानपिचक्‍या दिल्या आहेत. "रस्ते पूर्ण करा. स्वस्तातल्या विमान कंपन्यांकडे जा. त्या औरंगाबादेत सेवा देतील, यासाठी प्रयत्न करा,' असा सल्लाच त्यांनी आपल्या ट्‌विटर संदेशात विमानतळ प्राधिकरणाला टॅग करून दिला आहे. 

विशेषतः अजिंठ्यात उन्हाचा त्रास मोठा आहे. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात पर्यटकांची संख्या रोडावते. यंदा रस्त्याचेही कारण आहेच; पण तुलनेने वेरूळ, औरंगाबादला पर्यटक यावर्षी चांगल्या संख्येने आले आहेत. 
- डॉ. दिलीपकुमार खमारी, अधीक्षक, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (औरंगाबाद मंडळ). 

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने या रस्त्यासाठीचा निधी मिळण्यास विलंब झाला होता. आता निधी मिळत आहे. त्यामुळे सावंगीपासून सिल्लोडपर्यंतचा रस्ता जूनअखेरपर्यंत पूर्ण होईल, तेव्हा अजिंठ्याचा प्रवास पुन्हा सुखकर होईल. 
- एल. एच. जोशी, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम (राष्ट्रीय महामार्ग विभाग). 

अनेक पर्यटकांनी, राजदूतांनी आमच्याकडेही तक्रारी केल्या आहेत. आम्ही बऱ्याच विमान कंपन्यांना प्रस्ताव दिले आहेत; पण उद्या विमाने आली, त्यातून पर्यटक आले, तरी त्यांना फिरवायचे कोणत्या रस्त्यांवर? रस्ते चांगले करा. तरच विमान कंपन्याही इथे सेवा देण्यात उत्सुकता दाखवतील. 
- डी. जी. साळवे, विमानतळ निदेशक, चिकलठाणा. 

पर्यटकांची संख्या कमी झाली, हे सत्यच आहे; पण आता पुढे पर्यटनाचाच मोसम तोंडावर आहे. पावसाळा, हिवाळ्यात अजिंठ्याला पर्यटकांची पसंती असतेच. मात्र, रस्त्यांची हीच परिस्थिती राहिली, तर ही संख्या आणखी कमी होऊ शकते. त्यामुळे रस्ता लवकर बनविला पाहिजे. 
- विजय जाधव, प्रादेशिक व्यवस्थापक, एमटीडीसी. 

सहा महिन्यांचा आलेख 
महिना - देशी पर्यटक - विदेशी पर्यटक - सार्क आणि बिम्स्टेक देश 
डिसेंबर - 48818 - 2853 - 1095 
जानेवारी - 37246 - 3352 - 536 
फेब्रुवारी - 21431 - 3541 - 1079 
मार्च - 15942 - 2484 - 555 
एप्रिल - 9676 - 816 - 139 
मे - 14957 - 461 - 89


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tourists boycott at Ajanta caves