file photo
file photo

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याला पकडले


औरंगाबाद,: करमाड उपबाजार समितीत 55 शेतकऱ्यांचा 26 लाखांचा माल घेऊन फरार झालेल्या गजानन रावसाहेब शिंदे  या व्यापाऱ्याच्या मंगळवारी (ता.1) पोलिसांनी मुसक्‍या आवळल्या. त्याच्याविरोधात करमाड पोलिस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. "सकाळ'ने हा विषय लावून धरल्यामुळे पोलिसांबरोबर बाजार समितीने आरोपीची शोधाशोध केली होती. आरोपी पकडला तरीही शेतकऱ्यांचे पैसे त्यांना अद्याप मिळालेले नाहीत. 


आधीच विविध आरोप-प्रत्यारोपांमुळे औरंगाबाद बाजार समिती चर्चेत आहे. करमाडच्या डाळिंब खरेदी मार्केट महिनाभरापासून चर्चेचे ठरले आहे. सुविधेसाठी सुरू केलेले हे मार्केट शेतकऱ्यासांठी डोकेदुखी ठरत आहे. विशेष म्हणजे, बाजार समितीच्या संचालक मंडळाने आपल्या मर्जीतील काही व्यापाऱ्यांना दोनशे रुपयांच्या शुल्कावर परवाना दिला आहे. त्यातील एक व्यापारी गजानन शिंदे हा टोमॅटोचा परवाना असताना डाळिंबाची खरेदी करीत होता. त्याने काही शेतकऱ्यांना नगदी पैसे तर उर्वरित पैसे हे धनादेशने दिले होते. हे चेक बाऊन्स झाले. चेक बाऊन्स झाल्यानंतर शेतकऱ्यांनी शिंदेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र होऊ शकला नाही. यामुळे शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे धाव घेत तक्रार दाखल केली होती. महिनाभरापासून झालेल्या या फसवणुकीचा साधा गुन्हा बाजार समितीने दाखल होऊ दिला नव्हता. "सकाळ'मध्ये वृत्त प्रकाशित होताच बाजार समिती आणि पोलिसांनी त्या व्यापाऱ्याचा शोध घेत त्यास ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

बाजार समितीने केली शोधाशोध 

बाजार समितीचे सचिव विजय सिरसाट आणि अन्य सहकाऱ्यांनी दोन दिवसांपासून शिंदेची शोधाशोध केली. नाशिकसह इतर ठिकाणी त्याचा शोध घेण्यासाठी गेल्याचे स्वत: सिरसाट यांनी सांगितले. बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. मात्र, संचालक मंडळाला या प्रकाराविषयी कसलेच देणेघेणे नाही. सर्व संचालक मंडळ प्रचारात दंग आहे. स्वत: सभापतींचीही फसवणूक झाल्यानंतरही हा विषय त्यांनी गंभीरतेने घेतला नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. 
 
शेतकरी उपोषणाच्या तयारीत 

शेतकऱ्यांना मालाचे पैसे मिळालेले नाही. ते कधी मिळणार हे निश्‍चित नसल्याने शेतकऱ्यांतर्फे आता बाजार समितीच्या विरोधात उपोषण करण्याची तयारी सुरू केली आहे. पैसे मिळेपर्यंत हे उपोषण करणार असल्याचा निर्धारही शेतकऱ्यांनी केला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com