नांदेड : व्यापाऱ्याला 66 लाखांचा गंडा

प्रल्हाद कांबळे
रविवार, 18 ऑगस्ट 2019

भोकर येथील एका व्यापाऱ्याचा ५६ लाख ४१ हजारांचा तीळ खरेदी करून पुन्हा परत १० लाख हातउसणे घेऊन असे ६६ लाख ४१ हजार रुपये परत केले नाही.

नांदेड : भोकर येथील एका व्यापाऱ्याचा ५६ लाख ४१ हजारांचा तीळ खरेदी करून पुन्हा परत १० लाख हातउसणे घेऊन असे ६६ लाख ४१ हजार रुपये परत केले नाही. त्यामुळे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याने भोकर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुजरातच्या व्यापाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा शनिवारी (ता. १७) रात्री दाखल झाला आहे. 

भोकरच्या मार्केटयार्डमध्ये वेणुगोपाल राध्येशाम आसावा (वय २९) यांचे ट्रेडिंगचे दुकान आहे. त्यांच्याशी ओळख करून गुजरात राज्यातील माहेनुर, मार्केट कमिटी रोड, शांतीलाल गोडावून, गांधीधाम (कच्छ) येथील व्यापारी अहमदभाई हरुनभाई गलेरिया यांनी तीळ खरेदी केला. आसावा यांना जीएसटी व पॅनकार्ड क्रमांक देऊन १५ दिवसात आरटीएस या प्रणालीद्वारे मालाचे ५६ लाख ४१ हजार ६४९ रुये पाठवून देतो. हा व्यवहार १२ ऑक्टोबर २०१७ मध्ये नवा मोंढा येथे झाला होता. त्यानंतर उलट आसावा यांच्याकडूनच पुन्हा विश्वासाने १० लाख रुपये हातउसणे घेतले. ते अद्यापपर्यंत दिले नाही.

तब्बल एक वर्ष म्हणजे सन २०१८ पर्यंत सतत पाठपुरावा केला. ६६ लाख ४१ हजार रुपये देण्यास तो चालढकल करीत होता. शेवटी तर त्याने आपला मोबाईल बंद केला. रोख रक्कम व माल घेऊन आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर वेणूगोपाल आसावा यांनी भोकर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन अहमदभाई गलेरियाविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक विकास पाटील हे करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trader Fraud of 66 Lakh in Nanded