BharatBand: उस्मानाबाद जिल्ह्यातील दुकाने राहणार बंद, व्यापारी महासंघाचे भारत बंदला पाठिंबा

तानाजी जाधवर
Monday, 7 December 2020

देशामध्ये सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी एक दिवसाचा भारत बंद पुकारण्यात आला आहे. त्याला जिल्ह्यातील विविध संघटनानी पाठिंबा दिल्याचे दिसुन येत आहे. तसेच जिल्हा जनआंदोलन समिति व सर्व पक्षाच्या आवाहनास प्रतिसाद देत मंगळवारच्या (ता.आठ)भारत बंदला उस्मानाबाद जिल्हा व्यापारी महासंघानेही पाठिंबा दिला आहे.

उस्मानाबाद : देशामध्ये सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी एक दिवसाचा भारत बंद पुकारण्यात आला आहे. त्याला जिल्ह्यातील विविध संघटनानी पाठिंबा दिल्याचे दिसुन येत आहे. तसेच जिल्हा जनआंदोलन समिति व सर्व पक्षाच्या आवाहनास प्रतिसाद देत मंगळवारच्या (ता.आठ)भारत बंदला उस्मानाबाद जिल्हा व्यापारी महासंघानेही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दुकाने व्यापार बंद राहणार आहेत. याद्वारे जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांना आंदोलनास पाठिंब्याच्या निमित्ताने सर्व आस्थापने बंद करण्याबाबत उस्मानाबाद जिल्हा व्यापारी महासंघाने अवाहन देखील केले आहे.

उत्तरेकडील मुख्यतः पंजाब, हरियाना या राज्यामध्ये गेल्या अकरा दिवसांपासून शेतकऱ्यांनी नवीन शेती कायद्याला विरोध केला आहे. त्यांच्या विविध मागण्यासाठी त्यानी अकरा दिवसांपासून आंदोलन सुरु केले आहे. त्याचे पडसाद अन्य राज्यामध्ये सुद्धा पडत असल्याचे दिसुन येत आहे. गेल्या अकरा दिवसांपासून केंद्र सरकारबरोबर शेतकरी नेत्यांशी चर्चेच्या फेऱ्या झाल्या आहेत. मात्र त्यातून अद्याप ठोस असे काहीच निष्पन्न झालेले नाही. त्यामुळे साहजिकच हे आंदोलन अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. त्याला आता राज्यातील सरकारनेही पाठिंबा दर्शविल्याने भारत बंदला सुद्धा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. अनेकांनी स्वतःहुन अगदी उत्स्फुर्तपणे बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे सांगितले आहे.

विविध राजकीय पक्ष, शेतकरी संघटना यानीही या अगोदरच बंद मध्ये सहभागी होणार असल्याचे जाहीर केले होते. गेल्या काही दिवसांपासून व्यापारी नेमके काय करणार याकडे लक्ष लागुन राहिले होते. त्यांनी ही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये हा बंद कसा राहिल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सार्वजनिक वाहतुक व्यवस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने काही प्रमाणात गैरसोय होणार असली तरी शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या मुद्द्यावर आंदोलन सूरु असल्याने त्याबाबत अधिक ओरड होण्याची शक्यताही कमी झाली आहे. या आंदोलनाला भाजप व त्यांच्या सोबतच्या इतर संघटना या बंदमध्ये सहभागी नसतील असे चित्र आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traders Federation Of Osmanabad District Support Bharat Band