ट्रॅव्हल्स कंपन्यांची दिवाळी; प्रवाशांचे दिवाळे, भाड्यात दुप्पट वाढ

अनिल जमधडे
सोमवार, 14 ऑक्टोबर 2019

खासगी बसच्या तिकिटांचे वाढवले दर, प्रवाशांची सुरू झाली लूट 

औरंगाबाद - दिवाळीतील गर्दीच्या अनुषंगाने खासगी ट्रॅव्हल्स बस कंपन्यांनी लूट सुरू केली. विशेष म्हणजे गेल्या वर्षी "सकाळ'च्या पाठपुराव्याने आरटीओ कार्यालयाने कारवाई केली होती. यंदा मात्र दिवाळी तोंडावर आलेली असतानाही अजूनपर्यंत आरटीओ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना जाग आली नाही. 

दिवाळीनिमित्त ट्रॅव्हल्स कंपन्यांनी प्रवासभाड्यात दुप्पट भाडेवाढ केली. पुढच्या आठवड्यात ही भाडेवाढ तिप्पट होण्याची भीती आहे. नियमाप्रमाणे एसटी भाड्यापेक्षा दीडपट अधिक भाडे ट्रॅव्हल्सचालकांना घेण्याची मुभा गेल्या वर्षी परिवहन विभागाने दिलेली आहे. असे असतानाही ट्रॅव्हल्स व्यावसायिक प्रवाशांची अधिक भाडे आकारून लूट करीत आहेत. अधिक भाडे आकारणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या विरोधात गेल्या वर्षी परिवहन विभागाने कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी टोल फ्री क्रमांकाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यासाठी शहरातील शहानूरमियॉं दर्गा, मध्यवर्ती बसस्थानक, सिडको बसस्थानक, महावीर चौक व करोडी या ठिकाणी भाडेनिश्‍चितीचे फलक लावले होते. यंदा मात्र अद्याप परिवहन विभाग आणि आरटीओ कार्यालय झोपेतच आहे. ट्रॅव्हल्सचालकांनी नियमापेक्षा अधिक तिकीट घेऊ नये यासाठी आतापासूनच आरटीओ कार्यालयाने ट्रॅव्हल्स एजन्सीवर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथक नियुक्त करण्याची गरज आहे. 
 
अशी होते भाडेवाढ 
ट्रॅव्हल्स एजन्सीकडे प्रवासी आल्यानंतर निश्‍चित प्रवासाच्या तिकिटाची विचारणा करतो. त्यावेळी समजा पुणे प्रवासाची विचारणा केली, तर त्याला पुणे दिवाळीमुळे फुल्ल असल्याचे सांगितले जाते. ठराविक तिकिटे शिल्लक असल्याचे सांगून दीड ते दोनपट अधिक दर सांगितला जातो. आत्ताच बुक केले तर हा दर आहे, आणखी वेळ निघून गेला तर आणखी तिकीट वाढतील, अशी भीती दाखवून प्रवाशांची लूट केली जाते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Travel fares increased