होम क्वारंटाइन ऊसतोड मजूरांनी फुलवली बाग 

धनंजय देशपांडे
Saturday, 16 May 2020

नेहमीच काब्बाड कष्ट करण्याची सवय असलेल्या ऊसतोड मजुरांना शाळेत क्वारंटाइन केल्यानंतर त्यांना बिन कामाचे बसवत नसल्याने त्यांनी स्वइच्छाने शाळा परिसरात लागवड केलेल्या झाडांचे संगोपन करण्यास सुरुवात केली.

पाथरी (जि.परभणी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाथरी तालुक्यातील वडी येथील जिल्हा परिषद शाळेत गावातील ऊसतोड मजूर होम क्वारंटाइन करण्यात आले असून हे मजुर बसून न राहता उन्हाळ्याच्या दिवसात शाळेच्या परिसरातील लावलेल्या झाडांची विशेषतः काळजी घेत आहेत. वृक्षाचं संवर्धन करत असून कडक उन्हात ही या मजुरांनी झाडांची घेतलेली काळजी शाळेच्या सौंदर्यात भर टाकत आहे. शाळेतील फुलवलेली बाग सर्वांचे लक्ष वेधत आहे.

नेहमीच काब्बाड कष्ट करण्याची सवय असलेल्या ऊसतोड मजुरांना शाळेत क्वारंटाइन केल्यानंतर त्यांना बिन कामाचे बसवत नसल्याने त्यांनी स्वइच्छाने शाळा परिसरात लागवड केलेल्या झाडांचे संगोपन करण्यास सुरुवात केली. त्यांनी सर्व झाडांची अंतर्गत मशागत करून झाडाचे आळे खोद काम करून, त्यांना पाणी देणे, परिसर स्वच्छ करून, काडी कचरा नष्ट करुन परिसरात येणाऱ्या उपद्रवी वानराचा देखील त्यांनी प्रतिबंध केला. शाळा परिसर रोज सकाळ सायंकाळ स्वच्छता मोहीम अभियान राबविले असून परिसरात कोणाला उघड्यावर देखील शौचालयास येणाऱ्यास प्रतिबंध करत आहेत.

हेही वाचा : परभणी ग्रीनमधून पुन्हा ऑरेंजमध्ये

सोशल डिस्टान्सिंगचे पालन
टोळी मुकदम दत्ता शिंदे, त्यांची पत्नी शारदा शिंदे यांच्यासह रंजित होळकर, अरुण देशमुख, देविदास होळकर, त्रिंबक खेत्री, संजय होळकर, बाबासाहेब थोरात, यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील महिलादेखील स्वयंपाक पाणी आटपल्या नंतर परिसरात खूरपण्याने निंदणी करणे, सडा सारवरण करणे आदी काम सोशल डिस्टान्सिंगचे पालन करत आहेत. त्यांच्या कामाचे कौतुक सरपंच चंदाताई कुटे, उपसंरपच प्रताप शिंदे, ग्रामसेवक भगवान शेळगे, माझ गांव माझे योगदान उपक्रमाचे संकल्पनाकार अप्पा वडीकर, वृक्षमित्र आबासाहेब शिंदे, साद ग्राम अध्यक्ष शिवाजी कुटे, शालेय व्यव्थापन समितीचे अध्यक्ष सिध्दु पाटील, मूंजा रोडे, रामदास कुटे, धूराजी शिंदे, संजय खंडागळे, गोपाळ शिंदे यांनी केले.

हेही वाचा : Big Breaking : नांदेडात आज १८ पॉझिटिव्ह
 

भाजीपाला किटचे वाटप
जिल्हा परिषद शाळेत होम क्वारंटाइन करण्यात आलेल्या ऊसतोड मजुरांनी शाळेचा परिसर देखणा केल्यानंतर आपण समाजाचे काहीतरी देणे लागत. या उदात्त भावनेने जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षकांच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक संजय चिंचाणे, मुंजाभाऊ रोडे यांनी गावातील शाळेत होम क्वारंटाइन केलेल्या ऊसतोड मंजुराना भाजी पाल्याच्या किटचे वाटप केले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tree maintenance by home quarantine workers Parbhani News