ताशाची तर्री अन्‌ ढोलांचा गजर, नादगंधर्वचा सोबतच निसर्ग जागर

संकेत कुलकर्णी
बुधवार, 31 जुलै 2019

गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत किंवा महापुरुषांच्या जयंती मिरवणुकीत दणक्‍यात ढोल बडवणारे तरुण मिरवणूक संपली, की आपापल्या धुंदीत घरी जातात, ते
पुन्हा पुढच्याच वर्षी भेटतात; पण उद्याने, खुल्या जागा आणि नागरिकांच्या घरोघर जाऊन रोपे लावण्याचा आणि ऐन दुष्काळात ती जगवण्याचा आदर्श 'नादगंधर्व' वाद्य पथकातील तरुणांनी घालून दिला आहे. ताशाची तर्री आणि ढोलांच्या गजराबरोबरच निसर्गसंवर्धनाचा जागरही त्यांनी मांडला आहे. 

औरंगाबाद - गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत किंवा महापुरुषांच्या जयंती मिरवणुकीत दणक्‍यात ढोल बडवणारे तरुण मिरवणूक संपली, की आपापल्या धुंदीत घरी जातात, ते
पुन्हा पुढच्याच वर्षी भेटतात; पण उद्याने, खुल्या जागा आणि नागरिकांच्या घरोघर जाऊन रोपे लावण्याचा आणि ऐन दुष्काळात ती जगवण्याचा आदर्श 'नादगंधर्व' वाद्य पथकातील तरुणांनी घालून दिला आहे. ताशाची तर्री आणि ढोलांच्या गजराबरोबरच निसर्गसंवर्धनाचा जागरही त्यांनी मांडला आहे. 

आपल्या ढोल वादनाने रसिकांची मने जिंकण्याबरोबरच सामाजिक जाणिवेचे भान ठेवून "नादगंधर्व वाद्य पथका'तील तरुणांनी जून महिन्यात वृक्षारोपणाचा संकल्प केला. गारखेडा भागातील काही उद्याने, खुल्या जागांवर रोपे लावलीच; शिवाय कित्येक नागरिकांच्या घरी जाऊन त्यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेतही वृक्षारोपण केले. या झाडांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्याबरोबरच ही मंडळी परिसरातील विविध उद्यानांत यापूर्वी सरकारी किंवा इतर सामाजिक संस्थांनी लावलेल्या बेवारस झाडांचीही निगा राखत असल्याचे दुर्मिळ दृश्‍य पाहायला मिळत आहे. पर्यावरण दिनापासून संपूर्ण पावसाळाभर हे तरुण रोज सकाळी जमून शहराच्या विविध भागांत वृक्षारोपण करीत आहेत. 

पथकाने गेल्या उन्हाळाभर चैतन्य हौसिंग सोसायटीची खुली जागा, विशालनगरचे उद्यान, प्रियदर्शिनी उद्यानातील झाडांना रोज पाणी घातले. प्रियदर्शिनी उद्यानातील वृक्षसंपदा वाचवण्यासाठी मोठ्या परिश्रमाने त्यांनी उद्यानात पाणी अडवण्यासाठी छोटे बंधारे तयार केले आहेत. नागरी वस्त्यांमध्ये पर्यावरण संवर्धनासाठी शाहिरी पथकांमार्फत जागृतिपर भारुडेही सादर केली. झाडे लावण्याबरोबरच पाण्याची बचत आणि फेरभरणासाठीही 'नादगंधर्व'चे तरुण प्रयत्नशील आहेत. रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी सर्व तांत्रिक माहिती ते घरोघर जाऊन पुरवतात आणि तेही पूर्ण मोफत.  अशा या उपक्रमात शहरातील निसर्गप्रेमी नागरिकांनी सहभाग घ्यावा, अशी विनंती पथक अध्यक्ष सुमित देशपांडे, मुख्य प्रशिक्षक अमित देशपांडे, सारिका लोणीकर, अपूर्वा केदारे, प्रीती कुलकर्णी, अभिषेक कुलकर्णी, सर्वेश भाले, वेदांत कुलकर्णी, केदार चारठाणकर, देवेंद्र देशपांडे, व्यंकटेश देशपांडे, प्रसाद बोड्डावार, योगीराज जाधव, मंदार देशमुख आदींनी केली आहे. 

 

अमाप वृक्षतोड, सरकारी तसेच नागरीस्तरावरील उदासीनतेमुळे आपल्या शहराची स्थिती वाळवंटी आणि बकाल होत आहे. हे बदलण्यासाठी "नादगंधर्व' सतत प्रयत्नशील राहील.लोकचळवळीच्या माध्यमातून रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठीसुद्धा आम्ही प्रयत्नशील आहोत. 
- सुमित देशपांडे, अध्यक्ष, नादगंधर्व वाद्य पथक 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tree plantation by Ganapati Mandal