तुळजाभवानी मातेची अश्‍विनी पौर्णिमा उत्साहात, भाविकांची अनुपस्थिती

जगदीश कुलकर्णी
Saturday, 31 October 2020

तुळजाभवानी मातेची अश्विनी पौर्णिमा शनिवारी (ता.३१) परंपरेने पार पडली.

तुळजापूर (जि.उस्मानाबाद)  : तुळजाभवानी मातेची अश्विनी पौर्णिमा शनिवारी (ता.३१) परंपरेने पार पडली. भाविकांना येण्यास प्रशासनाने निर्बंध घातल्याचा परिणाम जाणवला. तथापि काही भाविकांनी कोणत्याही मार्गाने हजर होऊन महाद्वारातून दश॔न घेतले. तुळजाभवानी मंदिरात शनिवारी पहाटे तुळजाभवानी मातेची निद्रिस्त मूर्ती सिंहासनावर आधिष्टीत करण्यात आली. त्यानंतर तुळजाभवानी मातेस नित्योपचार अभिषेक झाले. त्यानंतर तुळजाभवानी मंदिरात अंगारा मिरवणूक झाली.

Job Alert : अडीच हजारांवर रिक्तपदांसाठी ऑनलाईन महारोजगार मेळावा, एक नोव्हेंबरपासून सुरूवात

तुळजाभवानी मातेचा भिंगार येथून आलेला पलंग होमकुंडात अर्पण करण्यात आला. तसेच पलंगवाले, पालखीवाले यांचे तुळजाभवानी मातेस परंपरेने नैवेद्य पहाटे दाखविण्यात आले. तुळजाभवानी मंदिर भाविकांविना असल्याने केवळ मर्यादितच महंत, पुजारी, सेवेधारी, तुळजाभवानी मातेचे उपाध्ये, तुळजाभवानी मातेचे भोपे पुजारी उपस्थित होते. प्रशासनाने भाविकांना येण्यास निर्बंध केला असला तरीही सुमारे दहा ते १५ हजार भाविक शहरात आल्याचे दिसून आले. अनेकजण महाद्वारात तुळजाभवानी मातेपुढे नतमस्तक होऊन परत जात होते. काही जणांनी तर एसटी आणि अन्य वाहनातून शहराबाहेर येऊन चालत येण्याचा आपला शिरस्ता कायम ठेवला.

दरम्यान तुळजाभवानी मातेच्या काठ्या परंपरेने शहरात रात्री उशीरा येणार आहेत. यंदा काठ्यांचे मानकरी दररोज सोलापूर येथून येणे जाणे येत्या ४ नोव्हेंबरपर्यत करणार आहेत. मात्र शनिवारी येथे सायंकाळी काठ्या दाखल झाले. तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील पलंगाची प्रक्षाळ शुक्रवारी (ता.३०) पार पडली. शनिवारी दिवसभर तुळजाभवानी मंदिरात भाविक कोरोनाच्या पाश्वभूमीवर मंदिरात येऊ शकले नाहीत. शहरात पोलिसांनी प्रमुख रस्त्यावर पूर्णपणे नाकाबंदी केली होती.

संपादन - गणेश पिटेकर

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tuljabhavani Mata's Ashwini Pornima Celebrated Tuljapur