तुळजाभवानी मातेचे सीमोल्लंघन, यंदा पालखीची मिरवणूक नाही

जगदीश कुलकर्णी
Monday, 26 October 2020

तुळजाभवानी मातेचे सीमोल्लंघन सोमवारी (ता.२६) पहाटे भाविकांविना पार पडले. शहरात तुळजाभवानी मातेच्या भिंगार येथून आलेल्या पालखीचे आगमन रविवारी (ता.२५) सायंकाळी झाले.

तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : तुळजाभवानी मातेचे सीमोल्लंघन सोमवारी (ता.२६) पहाटे भाविकांविना पार पडले. शहरात तुळजाभवानी मातेच्या भिंगार येथून आलेल्या पालखीचे आगमन रविवारी (ता.२५) सायंकाळी झाले. पालखीची मिरवणूक यंदा न काढता केवळ ट्रॅक्टरमध्ये पालखी ठेवण्यात आली होती. तसेच पालखीची मिरवणूक नसल्याने संबळाचा आवाज नव्हता.

दुर्गामातेच्या दीप ज्योतीला मुस्लिम महिलांनी अर्पण केले तेल, औरंगाबाद जिल्ह्यात सामाजिक ऐक्याचे दर्शन

रविवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास पालखी शुक्रवार पेठ, किसान चौकी, आर्य चौकमार्गे पहाटे तीन वाजता तुळजाभवानी मंदिरासमोर आली. चारशे ते पाचशे महिला केवळ पोत हातात घेऊन पालखीच्या पुढे सहभागी झाल्या होत्या. पलंग भिंगार येथून आला. तसेच पलंग दरवर्षी ज्या ठिकाणी शुक्रवार पेठेत असतो. तेथे गेला नाही. घाटशीळ वाहनतळावरून थेट तुळजाभवानी मंदिरात आला. तत्पूर्वी तुळजाभवानी मंदिरात मध्यरात्री तुळजाभवानी मातेस अभिषेक झाल्यानंतर दिंड बांधण्याचे काम देवीचे भोपे पुजारी संजय कदम, सचिन पाटील, विकास मलबा यासह अनेक भोपे पुजारी तसेच महंत तुकोजी बुवा यासह महंतांनी केले.

पालखीचे पहाटे तुळजाभवानी मंदिरात आगमन झाल्यानंतर सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास तुळजाभवानी मंदिरात पहाटे बुऱ्हानगर येथून आलेल्या पालखीमध्ये तुळजाभवानी मातेची मिरवणूक झाली. त्यानंतर पलंग तुळजाभवानी मातेच्या सिंहाच्या गाभाऱ्यात नेण्यात आला. त्यानंतर तुळजाभवानी मातेच्या मूर्तीवरील बांधण्यात आलेल्या १०८ साड्यांचे दिंड काढण्यात आले. तुळजाभवानी मातेच्या पलंगावर दिंड काढताना पलंग आणणारे मंडळी खाली वाकतात. त्यावर उभा टाकून भोपे पुजारी दिंड काढतात.

उस्मानाबाद जिल्ह्याच्या पीडित मुलीला न्याय मिळणार का? लोहाऱ्यात विविध संघटनांनी काढला मोर्चा

तुळजाभवानी मातेचे त्यानंतर चरणतीथ॔ झाले. आज सोमवार तारीख २६ पासून येत्या शनिवारी तारीख ३१ पर्यत तुळजाभवानी मातेची मूर्ती सिंहाच्या गाभाऱ्यात निद्रिस्त राहणार आहे. पालखीवाले विजय भगत, जितेंद्र भगत, मायमोरताबवाले सागर क्षीरसागर , अंबादास क्षीरसागर, तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे मानकरी उमेश वसंत पलंगे, गणेश पलंगे, अनंत पलंगे तसेच अंबादास औटी आदींना भर पेहराव आहेर तुळजाभवानी मंदिर समितीच्या वतीने तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, पालिकेचे मुख्याधिकारी आशिष लोकरे, सिद्धेश्वर इंतुले आदी उपस्थित होते.

संबळाचा कडकडाट नव्हता
शहरात संबळाचा कडकडाट पलंग पालखीच्या मिरवणुकीत यंदा नव्हता. तसेच पलंगाची मिरवणूक शुक्रवार पेठेतल्या स्थानावरून निघालीच नाही. तुळजाभवानी मंदिरात पोत ओवाळणाऱ्या महिला सीमोल्लंघनाच्या वेळी नव्हत्या. तुळजाभवानी मंदिरात नगारा, संबळ, घाटी, डुमरू आदीसह पारंपरिक वाद्ये होती. तसेच तुळजाभवानी मातेस सीमोल्लंघन पारावर साखरभाताचे नैवेद्य दाखविण्यात आले आणि आरत्यांनी ओवाळण्यात आले. प्रशासनाने शारीरिक अंतराचा मोठा गाजावाजा केला.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tuljabhavani Mata's Simollanghan Without Devotees Tuljapur