esakal | ऊसगाळपात तुळजापूर स्वयंपुर्णतेकडे?
sakal

बोलून बातमी शोधा

Tuljabhavani Sugar Factory

ऊसगाळपात तुळजापूर स्वयंपुर्णतेकडे?

sakal_logo
By
सयाजी शेळके

उस्मानाबाद - ऊस (Sugarcane) गाळपासाठी अन्य जिल्ह्यावर अवलंबन असणाऱ्या तुळजापूर तालुक्यातच नव्याने कारखाना (Factory) सुरू होत आहे. शिवाय तुळजाभवानी साखर कारखाना सुरू होण्याच्या हालचाली वेगवान झाल्याने यंदा तालुक्यातील शेतकऱ्यांना (Farmer) दिलासा मिळाला आहे. तुळजापूर तालुक्यात ऊसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. लहान मोठे सिंचन प्रकल्प असल्याने कायम पाणी असलेला तालुका म्हणून तुळजापूरची ओळख आहे. त्यामुळे ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही मोठी आहे.

दरम्यान तालुक्यात ऊसाचे क्षेत्र असूनही दरवर्षी गाळपाचा मोठा प्रश्न तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर उभा राहतो. तुळजाभवानी साखर कारखान्याची निर्मीती झाली. मात्र कारखाना सुरळीत चालेल असे नेतृत्व तालुक्यात तयार झाले नाही. अखेर बंद पडलेल्या साखर कारखान्यास अनेकांनी चालविण्याचा प्रयत्न केला. मात्र अपेक्षित यश आले नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना कायम ऊस गाळपाचा प्रश्न भेडसावत होता.

हेही वाचा: उस्मानाबाद जिल्ह्याची औषधविक्री व्यवस्था रामभरोसे?

इतर जिल्ह्यांचा आधार

तालुक्यात सध्या एकमेव कंचेश्वर शुगर कार्यरत आहे. मात्र ऊसाचे क्षेत्र जास्त असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना सोलापूर जिल्ह्याचा आधार घ्यावा लागतो. सोलापूर जिल्ह्यातच ऊसाचे क्षेत्र जास्त असल्याने येथील ऊस गाळपासाठी अव्वाच्या सव्वा दर दिला जातो. तालुक्यातील शेतकऱ्यांची कायम दरावरून कोंडी होते. `ऊस देणार असेल तर हा दर मिळेल` असे खासगी भाषेत सांगितले जाते. त्यामुळे अडचणीत असलेले शेतकरी कवडीमोल दराने ऊस गाळपासाठी परजिल्ह्यात देतात. कागदोपत्री असे प्रकार उघडीस येत नाहीत. कायम चक्रविव्हामध्ये अडकलेल्या शेतकऱ्यांना नवीन कारखान्यांमुळे आशेचा किरण दिसत आहे.

सिद्धिविनायकसह तुळजाभवानी भाडेतत्वावर

देवकुरुळी (ता. तुळजापूर) येथील श्री सिद्धिविनायक ॲग्रीटेक इंडस्ट्रीज कारखान्यात गुळाचे उत्पादन होणार आहे. त्याची ऊसगाळप क्षमता ६०० मेट्रीकटन प्रतिदिन आहे. असे असले तरी किमान एक हजारच्या क्षमतेने कारखाना चालू शकतो. शुक्रवारी (ता. १०) कारखान्याचे रोलर पूजन झाले आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात हा कारखाना सुरु होत आहे. याशिवाय तुळजाभवानी साखर कारखानाही भाडेतत्वावर चालविण्यास देण्याबाबात निविदा अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे दोन्ही साखर कारखाने यंदाच्या हंगामात सुरू होत असल्याने तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे.

loading image
go to top