तुळजापुरला चैत्री यात्रेनिमित्त लाखो भाविकांची गर्दी

जगदीश कुलकर्णी
शनिवार, 31 मार्च 2018

तुळजाभवानी मातेच्या चैत्री यात्रेनिमित्त अनेक गावातून पालख्या शहरात दाखल झाल्या आहेत. यात्रेमुळे शहरातील विविध रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत. चैत्र महिन्यात बहुतांश भाविक तुळजाभवानी मंदिरात नवीन परड्या घेतात.

तुळजापूर : आई राजा उदो- उदोच्या जयघोषात चैत्री यात्रेनिमित्त लाखो भाविकांनी तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी शनिवारी (ता. ३१) गर्दी केली होती. पहाटेपासूनच दर्शनमंडप आणि महाद्वारासमोर भाविकांची गर्दी झाली होती.

तुळजाभवानी मातेच्या चैत्री यात्रेनिमित्त अनेक गावातून पालख्या शहरात दाखल झाल्या आहेत. यात्रेमुळे शहरातील विविध रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत. चैत्र महिन्यात बहुतांश भाविक तुळजाभवानी मंदिरात नवीन परड्या घेतात. परड्या खरेदी करणे, देवीच्या बांगड्या हातात घालणे, यासह विविध धार्मिक विधी करण्यासाठी भाविकांची धावपळ सुरू होती. मंदिराच्या महाद्वारासमोर दर्शन पास दिले जातात.

त्याठिकाणी पास घेण्यासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. दर्शन पास घेऊन भाविक मंदिरातील दर्शन मंडपात जात होते. तेथून रांगेत तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी किमान तीन ते चार तासांचा अवधी लागत होता. शिखर शिंगणापूर येथील यात्रेला गेलेले बहुतांश भाविक पंढरपूर येथील विठ्ठल- रुक्मिणीचे दर्शन घेऊन चैत्री पौर्णिमेच्या यात्रेला तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येतात आणि तेथून ते येरमाळा (ता. कळंब) येथील येडेश्वरी देवीच्या यात्रेला रवाना होतात. दरवर्षीप्रमाणे एसटी महामंडळाने तुळजापूर ते येरमाळा अशा जादा बस सोडल्या आहेत. बसस्थानकावरही भाविकांची मोठी गर्दी होती.

Web Title: Tuljabhawani mandir in Tuljapur

टॅग्स