esakal | गाभाऱ्यातल्या एकांतात भक्ताने रेखाटले तुळजाभवानीचे तैलचित्र... 

बोलून बातमी शोधा

Osmanabad News

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिर भाविकांसाठी बंद असल्याने श्री. कुंभार यांना तैलचित्र साकारता आले. श्री. कुंभार हे चित्र तुळजाभवानी देवस्थान समितीस देणार असल्याचे सरव्यवस्थापिका योगिता कोल्हे यांनी ‘सकाळ’ला सांगितले. 

गाभाऱ्यातल्या एकांतात भक्ताने रेखाटले तुळजाभवानीचे तैलचित्र... 
sakal_logo
By
जगदीश कुलकर्णी

तुळजापूर (जि. उस्मानाबाद) : तुळजाभवानी मातेचे सुरेख तैलचित्र प्रसिद्ध चित्रकार दिग्विजय कुंभार यांनी रेखाटले. बुधवारी (ता.१८) तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यात सुमारे सलग सहा तास उभे राहून श्री. कुंभार यांनी हे तैलचित्र रेखाटले. 

तुळजापूर शहरातील मूळ स्थायिक कुटुंबीय घरात विवाह झाल्यानंतर तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आराध्य सेवेसाठी राहतात. चित्रकार दिग्विजय कुंभार यांचा नुकताच विवाह झाला असून, ते तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आराध्य सेवेसाठी मागील चार दिवसांपासून वास्तव्यास आहेत. मंदिराच्या परिसरातच राहून तुळजाभवानी मातेचे चरणतीर्थ, धुपारती, रात्रीचा अंगारा, प्रक्षाळ आदी सेवेसाठी उपस्थित राहण्याचे अनिवार्य असते.

चिंताजनक... राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ६४ वरून ७४ वर

तुळजाभवानी मंदिरात सध्या केवळ पुजारी, महंत पूजेस जातात. तसेच आराध्य सेवेसाठी चार-पाच जण सेवेला जातात. त्यामध्ये श्री. कुंभार यांचा समावेश आहे. दरम्यान, श्री. कुंभार यांनी तुळजाभवानी मातेचे तैलचित्र काढण्याची इच्छा प्रगट केली. त्यानंतर तुळजाभवानी मंदिर समितीच्या सरव्यवस्थापिका योगिता कोल्हे, महंत तुकोजीबुवा, महंत वाकोजीबुवा, महंत हमरोजीबुवा, पुजारी विशाल गंगणे, पुजारी निखिल आप्पा अमृतराव यांच्या सहकार्याने मंदिरातील गाभाऱ्यात सलग सहा तास उभे राहून मातेचे तैलचित्र रेखाटले.

श्री. कुंभार यांनी दोन बाय अडीच फुटाचे सुरेख तैलचित्र रेखाटले आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिर भाविकांसाठी बंद असल्याने श्री. कुंभार यांना तैलचित्र साकारता आले. श्री. कुंभार हे चित्र तुळजाभवानी देवस्थान समितीस देणार असल्याचे सरव्यवस्थापिका योगिता कोल्हे यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

कोरोनामुळे भाविकांसाठी मंदिर पूर्णपणे बंद असल्याने हे चित्र मला रेखाटता आले. तुळजाभवानी मातेसमोरच उभे राहून हे तैलचित्र रेखाटल्याचे खूप समाधान आहे. परंतु कोरोनामुळे उद्‌भवलेली अशी संधी मला नको आहे. जगभरातून कोरोना व्हायरस नष्ट व्हावा, हेच साकडे मी तैलचित्र काढताना तुळजाभवानी मातेला घातले आहे. 
- दिग्विजय कुंभार, चित्रकार, तुळजापूर