Breaking : कोरोनामुळे पंचवीस वर्षांच्या महिलेचा लातुरात मृत्यू

हरी तुगावकर
शुक्रवार, 26 जून 2020

लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाचे उपचार सुरु असलेल्या पंचवीस वर्षाच्या महिलेचा शुक्रवारी (ता.२६) सकाळी मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यूची संख्या पंधरा झाली आहे.

लातूर : येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाचे उपचार सुरु असलेल्या पंचवीस वर्षाच्या महिलेचा शुक्रवारी (ता.२६) सकाळी मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यूची संख्या पंधरा झाली आहे. आतापर्यंतच्या मृतामध्ये सर्वात लहान वय असलेली ही महिला आहे. या महिलेला पूर्वीचा कोणताही आजार नसल्याची माहितीही या संस्थेतील डॉक्टरांनी दिली.

ही महिला भिवंडी येथे राहत होती. ता.२१ जून रोजी ते भेटा (ता.औसा) येथे आली. या महिलेचे माहेर येथील माऊलीनगर भागात आहे. दोन दिवसांपूर्वी तिला अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे तिला ता.२४ जून रोजी रात्री येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. ती गंभीरच होती. त्यामुळे तिला व्हेंटीलेटरवरच ठेवण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी उपचार सुरु असतानाच या महिलेचा मृत्यू झाला आहे.

Latur Breaking : चिंताजनक ! लातुरात दिवसभरात १५ पॉझिटिव्ह

त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या पंधरा झाली आहे. यात ११ पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहे. मृतात ज्येष्ठ नागरीकांचा अधिक समावेश आहे. पण केवळ पंचेवीस वर्षाचा रुग्ण असणारी ही पहिलीच महिला मृत झाली आहे. त्यामुळे कोरोनाच्या बाबती चिंता अधिक वाढू लागली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधिताची संख्या २६६ झाली आहे. त्यात १८५ रुग्ण बरे झाले असून ६४ जणांवर उपचार सुरु आहेत.

 

गर्भवती मातेची कोरोनावर मात, लातूरकरांसाठी सलग दुसऱ्या दिवशी दिलासा
उस्मानाबादमधील गर्भवती मातेचा मागील आठवड्यात कोरोनामुळे लातुरात मृत्यू झाला. या घटनेनंतर लातूरमधील आणखी एका गर्भवती मातेला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे अनेकांची चिंता वाढली. मात्र, लातूरमधील संबंधित गर्भवती मातेने कोरोनावर मात केली असून त्यांना विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतून गुरुवारी (ता. २५) डिस्चार्ज देण्यात आला. त्यांच्यासह लातूर जिल्ह्यातील १२ जण कोरोनामुक्त झाले. कोरोनाबाधितांची संख्या लातूर शहरासह जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच बुधवारी (ता. २४) १६ जणांना बरे झाल्याने रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारीही (ता. २५) १२ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ५० असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या १८५ झाली आहे, तर उपचारादरम्यान १४ जणांचा मृत्यू झाला आहे.

 

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयातील सात रुग्णांची प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यामुळे त्यांना सुटी देण्यात आली. त्यापैकी एका रुग्णास मधुमेह होता. ते बारा दिवस अतिदक्षता विभागात होते. तीन रुग्णांना गंभीर स्वरूपाचा आजार होता. त्यांचे वय ५०, ५२ आणि ६५ वर्षे होते. तसेच इतर चार रुग्णांना सौम्य स्वरूपाचा आजार होता. हे रुग्ण २२ ते ६५ वर्षे वयोगटातील होते. त्यात ५ पुरुष, २ स्त्रिया होत्या. यात एका गर्भवती मातेचा समावेश होता. त्यांची प्रकृती पूर्णपणे बरी आहे. या सात रुग्णांपैकी शहरातील ४ रुग्ण व ग्रामीण भागातील ३ रुग्ण आहेत. यात बाभळगावमधील ३, मोतीनगरमधील १, जुनी कापड लाइन भागातील २ आणि भुसार लाइन भागातील एका रुग्णाचा समावेश आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी दिली.

रुग्णालयाबाहेर झाले स्वागत
१७ पैकी उर्वरित पाच रुग्ण हे निलंगा आणि उदगीरमधील आहेत. यात निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयातील एक आणि उदगीरमधील उपजिल्हा रुग्णालयातील चार रुग्णांचा समावेश आहे. या चार रुग्णांमधील किणी येथील तीन व नोबेल कॉलनी येथील एका रुग्णाचा समावेश आहे, असे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले. दरम्यान, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयातील सात रुग्णांना घरी सोडताना त्यांचे रुग्णालयाबाहेर स्वागत करण्यात आले. यावेळी डॉ. गिरीश ठाकूर, डॉ. मारुती कराळे, डॉ. किरण डावळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोषकुमार डोपे उपस्थित होते.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twenty Five Covid Infected Women Died Latur News