बीड, माजलगावातील दोघांवर एमपीडीए; आणखी १२ प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे

सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 9 December 2020

बीड जिल्ह्यातील गुंडगिरीवर पायबंद घालण्यासाठी पुन्हा एकदा पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पावले उचलली आहेत. आणखी दोघांवर एमपीडीएअंतर्गत कारवाई करुन त्यांची हर्सूल तुरूंगामध्ये रवानगी करण्यात आली आहे.

बीड : जिल्ह्यातील गुंडगिरीवर पायबंद घालण्यासाठी पुन्हा एकदा पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पावले उचलली आहेत. आणखी दोघांवर एमपीडीएअंतर्गत कारवाई करुन त्यांची हर्सूल तुरूंगामध्ये रवानगी करण्यात आली आहे.
सोमवारी (ता. सात) पेठ बीड भागातील लखन तुसांबड (२८, रा. वतारवेस ) व माजलगाव येञील संतोष गायकवाड (वय ३०, रा. केसापुरी कॅम्प) या दोघांवर कारवाई करण्यात आली. आणखी १२ जणांवर कारवाईचे प्रस्ताव पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी यांनी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्याकडे कारवाईसाठी पाठविले आहेत. पेठ बीड भागातील लखन तुसांबड याच्या विरोधात बीड शहर आणि पेठ बीड पोलिस ठाण्यात दंगा करणे, जबरी चोरी, दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन, शिविगाळ करणे, जीवे मारण्याच्या धमक्या देणे अशा गंभीर स्वरुपाचे सात गुन्हे नोंद होते.

औरंगाबादच्या शिरपेचात आणखी एक तुरा, ‘औरंगाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’टॉप टेनमध्ये

पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांनी लखनवर एमपीडीए नुसार कारवाईचा प्रस्ताव पोलिस अधीक्षकांकडे पाठवला होता. तर, माजलगाव शहरातील संतोष गायकवाड याच्या विरोधात माजलगाव शहर पोलिस ठाण्यात सरकारी नोकरांवर हल्ला करणे, दुखापत करणे, मारहाण करणे, दरोड्याची तयारी करणे, दंगा करणे, अवैध शस्त्र बाळगणे, मालमत्तेचे नुकसान करणे, दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणे असे सात गुन्हे नोंद आहेत. माजलगाव पोलिस निरीक्षकांनी त्याचा प्रस्ताव पोलिस अधिक्षकांकडे पाठवला होता.

पोलिस अधीक्षक आर. राजा यांनी प्रस्ताव जिल्हादंडाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे पाठवला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली. यानंतर दोन्ही गुन्हेगारांना अटक करुन हर्सूलमध्ये स्थानबद्ध केले. पोलिस निरीक्षक भारत राऊत, पोलिस निरीक्षक धनंजय फराटे, पोलिस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आर. बी. बनकर, अभिमन्यू औताडे, राम यादव, पोलिस नाईक सुनिल अलगट यांनी ही कारवाई केली
 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Accused Of Beed, Majalgaon Filed MPDA