जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी सकाळी अडीच तासांचा वेळ 

दत्ता देशमुख
Saturday, 28 March 2020

  • सात ते नऊ या वेळेत करता येणार खरेदी 
  • खासगी वाहनांना इंधन; बीडमध्ये पंप सील 
  • आपत्कालीन कामाशिवाय वाहन दिसले तर गुन्हा 
  • जिल्ह्यात एकही नाही कोरोना संशयित; आणखी दोन स्वॅबही निगेटिव्ह 

बीड - कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येणाऱ्या उपाययोजना आणखी कडक करण्यात येत आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सकाळी अकरा ते तीन ही असलेली वेळ आता केवळ सकाळी सात ते साडेनऊ अशी अडीच तासांचीच करण्यात आली आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी आणि लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सकाळी अकरा ते तीन या वेळेत संचारबंदी शिथिल होती; परंतु या काळात नागरिक मोठी गर्दी करू लागले. त्यामुळे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी ही वेळ बदलून सकाळी सात ते साडेनऊ अशी केली आहे. 

हेही वाचा -  साखरपुड्यात विवाह उरकून एक लाख दिले मुख्यमंत्री निधीत

खासगी वाहनांना इंधन; बीडमध्ये पंप सील 
केवळ अत्यावश्यक सेवेतील आणि शेतीसंबंधी वाहनांनाच इंधन द्यावे, इतर वाहनांना इंधन देऊ नये, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते; परंतु येथील जिल्हा परिषदेजवळील फारोकी एजन्सीच्या पंपावरून खासगी वाहनांना पेट्रोल-डिझेल दिले जात असल्याचे समोर आल्याने हा पंप सील करण्यात आला. तहसीलदार श्री. अंबेकर यांनी ही कारवाई केली. 

हेही वाचा - परीक्षा संपेपर्यंत तिला या दुःखाची कल्पनाच नव्हती...

दरम्यान, जिल्ह्यात अद्याप एकही कोरोना संशयित आढळला नाही. मागच्या दोन दिवसांत अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात एक व जिल्हा रुग्णालयात एक अशा दोघांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले होते. या दोन्हींचे अहवाल निगेटिव्ह आले. आता अंबाजोगाईत दोन, तर बीडमध्ये एक असे तिघे विलगीकरण कक्षात आहेत. 

केवळ अत्यावश्यक कामासाठीच वाहन; अन्यथा गुन्हा 
अत्यावश्यक साहित्याच्या खरेदीच्या नावाखाली नागरिक गर्दी करीत आहेत. त्यासाठी वाहने घेऊन बाहेर पडत आहेत. केवळ रुग्णालय व इतर अत्यावश्यक कामांसाठीच वाहनाने बाहेर पडावे, अन्यथा पोलिस गुन्हा नोंद करणार आहेत. शुक्रवारी संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी अकरा जणांवर कारवाई करण्यात आली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two and a half hours to buy essentials