दोन होड्या जाळल्या, माथेफिरुंनी वाहने फोडली, कुठे ते वाचा... 

Crime1
Crime1

सोनपेठ ः तालुक्यातील कान्हेगाव येथे अवैध वाळूचा उपसा करणाऱ्या दोन होड्या जप्त करून त्या जागेवरच जाळून टाकण्याची धडाकेबाज कारवाई सोनपेठ महसूल विभागाच्या पथकाने केली. तसेच गुरुवारी (ता.सात) रात्री ते शुक्रवारी (ता.आठ) सायंकाळपर्यंतच्या कालावधीत जिंतूरला माथेफिरुंनी वाहने फोडली आणि ताडकळसला कापसाची गंजी जळून खाक झाली. या विविध घटनांचा घेतलेला हा आढावा. 

तालुक्यातील कान्हेगाव येथील गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याची गुप्त माहिती गुरुवारी (ता. सात) सोनपेठ महसूल विभागाला मिळाली होती. त्यानुसार सोनपेठ तहसीलदार डॉ. आशिषकुमार बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी देवेंद्र चंदेल, तलाठी सोमनाथ एकलिंगे, राजकुमार चिकटे, सागर मस्के, सागर गडप्पा यांचे पथक ता. सात सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास नदीपात्राशेजारी गेल्यावर त्या ठिकाणी थर्माकोलने तयार केलेल्या चार होड्या अवैध वाळू उपसा करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

अवैध होड्या चालक मात्र पसार 
संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाहताच दोन होड्या नदीपात्रातून गंगाखेड तालुक्याच्या हद्दीत पळून गेल्या. परंतु, दोन होड्या महसूलच्या पथकाने ताब्यात घेऊन जप्त केल्या. या कारवाईत अवैध होड्या चालक मात्र पसार झाले. तसेच तालुक्यातील लासीना येथील गोदावरीच्या पात्रात अवैध वाळू उपसा चालू असल्याच्या माहितीवरून महसूलच्या पथकाने ता. आठ रोजी पहाटे धाड टाकली असता वाळू चोरी करणारे ट्रॅक्टर पळून गेले. मात्र, महसूल विभागाच्या पथकाने जागेवरून दोन दुचाकी ताब्यात घेतल्याची माहिती मंडळ अधिकारी देवेंद्र चंदेल यांनी दिली.

जागेवरच कारवाई...
अवैध वाळू उपसा करणाऱ्या थर्माकोलच्या दोन होड्या जप्त केल्यानंतर महसूल विभागाच्या पथकाने जप्त केलेल्या दोन्ही होड्या जागेवरच जाळण्यात आल्या. तसेच पळून गेलेल्या दोन होड्यांबाबत माहिती घेण्यात येत असून संबंधितांवर सक्तीची कारवाई करणार असल्याची माहिती तहसीलदार डॉ. आशिषकुमार बिरादार यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. 


गंगाखेड येथे महिलेचा मृतदेह आढळला
गंगाखेड गंगाखेड तालुक्यातील मानकादेवी येथील ७० वर्षांच्या वृद्ध महिलेचा मृतदेह नगरपालिका समोरील आशा झेरॉक्स दुकानाच्या ओट्यावर आढळून आल्याची घटना शुक्रवारी (ता. आठ) सकाळी दहा वाजता घडली. तालुक्यातील मानकादेवी येथील लक्ष्मीबाई नामदेव गजले (वय ७०) ही वयोवृद्ध महिला गेल्या दोन दिवसांपासून बंद दुकानासमोर बसली होती. या महिलेजवळ अन्न-पाणी काही नव्हते. सतत दोन दिवस ही महिला या ठिकाणी होती. सदर महिलेचा मृत्यू कशामुळे झाला असावा, ही चर्चा शहरांमध्ये सुरू होती. सदरील घटनेने संदर्भात आठ मे शुक्रवार सकाळी दहा वाजता येथील नागरिकांनी फोनद्वारे पोलिसांना कळविले. त्यानंतर सदर महिलेचे शव गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले आहे. तपास बिट जामदार आर. टी. देवकर हे करीत आहेत. 

जिंतूरला चारचाकी वाहने फोडली
जिंतूर ः शहरात गुरुवारी (ता.सात) मध्यरात्री दीडच्या सुमारास शिवाजीनगर आणि संभाजीनगर भागातील घरासमोर उभ्या असलेल्या महागड्या चारचाकी वाहनांची चार ते पाच माथेफिरूंनी दगड - विटांनी तोडफोड केली आहे. यात दहा ते बारा वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या वेळी अचानक जोरात येणाऱ्या वाहनांच्या तोडफोडीच्या आवाजाने परिसरातील नागरिक जागे झाले. शिवाजीनगर येथील काही युवकांनी या माथेफिरूंचा दूरवर पाठलाग केला. मात्र, अंधाराचा फायदा घेत हे माथेफिरू पसार झाले. यात पाठलाग करणाऱ्या एका युवकाच्या पायाला लोखंडी तार लागून मोठी जखम झाली. वाहनांची तोडफोड करणारे हे माथेफिरू नेमके कोण आहेत, तोडफोड करण्यामागे त्यांचा नेमका उद्देश काय होता, हे अद्याप स्पष्ट नसले तरी या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजवरून पोलिस या घटनेतील आरोपींचा शोध घेत आहेत. शुक्रवारी (ता. आठ) सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. 

कापसाची गंजी जळून खाक
ताडकळस ः पूर्णा रोडवरील जे. आर. कॉटनसमोर लावलेल्या कापसाच्या गंजीला अचानक आग लागून पाचशे ते सहाशे क्विंटल कापूस जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी (ता. सात) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. ताडकळस येथील पूर्णा रोडवरील संचालक नंदकिशोर मुंदडा यांच्या मालकीची जे. आर. कॉटन जिनिंगमध्ये समोरच्या दर्शनी भागात काही दिवसांपासून खासगी कापूस खरेदी करून गंजी लावली होती. या गंजीला अचानक आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटना समजताच तत्काळ सहायक पोलिस निरीक्षक सदाशिव लहाने, सुरेश मगरे आदी ग्रामस्थांनी आग विझविल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान, शुक्रवारपासून (ता. आठ) सुरू होणारी सीसीआयची कापूस खरेदी लांबणीवर पडली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com