आष्टी शहरात दोघा भावांचा पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला, उपचारासाठी बीड येथे हलविले 

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

आष्टी (जि. बीड) - तोंडाला मास्क न बांधता शहरातील बाजारपेठेत प्रवेश करण्यास रोखल्यानंतर दोन भावांनी मिळून दोन पोलिस कर्मचारी व होमगार्डवर हल्ला चढवत काठीने मारहाण करून जखमी केले. या मारहाणीत एक पोलिस शिपाई गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी बीड येथे हलविण्यात आले आहे. शनिवारी (ता. नऊ) शहरातील कमानवेशीजवळ हा प्रकार घडला. याबाबत दोघा भावांविरुद्ध आष्टी पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिवसाआड सकाळी सात ते साडेनऊ या वेळेत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने खुली ठेवण्यास परवानगी दिली आहे. शहरात या वेळेत होणारी गर्दी लक्षात घेऊन सोशल डिस्टन्सिंगचे पालन होण्याच्या दृष्टीने पोलिस प्रशासनाने ठिकठिकाणी पोलिस कर्मचारी व होमगार्डस नियुक्त केलेले आहेत. शनिवारी सकाळी कमानवेशीजवळ पोलिस शिपाई सचिन कोळेकर, रियाज पठाण व होमगार्ड शैलेश वांढरे हे बंदोबस्तावर होते.

या वेळी शांतीनाथ राजाराम फुंदे (वय ४०) व शरद राजाराम फुंदे (वय ४५, दोघे रा. शेकापूर, हल्ली मुक्काम पुणे) हे दोघे भाऊ बाजारपेठेत आले. तोंडाला मास्क न बांधता ते बाजारपेठेत प्रवेश करू इच्छित असल्याने कर्तव्यावरील पोलिसांनी त्यांना मज्जाव केला. याचा राग मनात धरून या दोघांनी सचिन कोळेकर, रियाज पठाण  व शैलेश वांढरे यांना काठीच्या सहाय्याने मारहाण करण्यास सुरवात केली.

या मारहाणीत वरील तिघे जण जखमी झाले. पोलिस शिपाई सचिन कोळेकर यांच्या डोक्याला काठीचा जोराचा मार लागल्याने त्यांना उपचारासाठी बीड येथे हलविण्यात आले आहे. याबाबत रियाज पठाण यांनी आष्टी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून शांतीनाथ फुंदे व शरद फुंदे या दोघा भावांवर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा तसेच राष्ट्रीय आपत्ती कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com