रानडुकराच्‍या हल्‍ल्‍यात दोन भाऊ गंभीर जखमी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जुलै 2019

औंढा नागनाथ तालुक्‍यातील जांब शिवारात रानडुकराच्‍या हल्‍ल्‍यात दोन भाऊ गंभीर जखमी झाले असून त्‍यांना उपचारासाठी नांदेडच्‍या शासकीय रुग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे.

हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्‍यातील जांब शिवारात रानडुकराच्‍या हल्‍ल्‍यात दोन भाऊ गंभीर जखमी झाले असून त्‍यांना उपचारासाठी नांदेडच्‍या शासकीय रुग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे.

औंढा तालुक्‍यात जांब येथील प्रकाश चंपतराव टोम्‍पे आणि अशोक चंपतराव टोम्‍पे हे मंगळवारी (ता.नऊ) शेतात पेरणीच्‍या कामासाठी गेले होते. शेतात पेरणी करत असताना अचानक रानडुकराने त्‍यांच्‍यावर हल्‍ला केला. अचानक झालेल्‍या हल्‍ल्‍यामुळे दोघेजण घाबरून गेले. त्‍यांनी आरडाओरड करताच परिसरात शेतातील शेतकरी मदतीसाठी धावून आले. मात्र रानडुकराने दोघांना चावा घेवून पळ काढला.

शेतकऱ्यांना जखमी झालेल्‍या  टोम्‍पे बंधूंना उपचारासाठी हिंगोलीच्‍या शासकीय रुग्‍णालयात आणले. मात्र या ठिकाणी लस नसल्‍याचे कारण दाखवत त्‍यांच्‍यावर प्राथमिक उपचार करून त्‍यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. या दोघांवर नांदेड येथे उपचार सुरु असल्‍याचे गावकऱ्यांनी सांगितले.

दरम्‍यान, जिल्‍ह्‍यात मागील काही दिवसांपासून रानडुकरांनी उपद्रव माजवला असून शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांसह मजुरांवर हल्‍ले होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्‍यामुळे पेरणी करण्यासाठी जाणाऱ्या शेतकरी व मजूरांतून भीतीचे वातावरण निर्माण होवू लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two brothers were seriously injured in the attack of wild boar