औरंगाबादेत कार्बाईडच्या स्फोटात दोन मुले जखमी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 एप्रिल 2017

औरंगाबाद - औरंगाबाद शहरातील आझाद चौक भागात रस्त्यावर पडलेल्या कार्बाईडसदृश पावडरवर पाय पडताच स्फोट झाला. दहा सेकंदांच्या अंतराने एकापाठोपाठ दोन स्फोट झाले. यात दोन मुले गंभीररीत्या भाजली. शनिवारी (ता. 8) सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली.

औरंगाबाद - औरंगाबाद शहरातील आझाद चौक भागात रस्त्यावर पडलेल्या कार्बाईडसदृश पावडरवर पाय पडताच स्फोट झाला. दहा सेकंदांच्या अंतराने एकापाठोपाठ दोन स्फोट झाले. यात दोन मुले गंभीररीत्या भाजली. शनिवारी (ता. 8) सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली.

वसीम खान छोटेखान (वय 9, रा. अल्तमश कॉलनी, रहिमनगर) आणि त्याचा मावस भाऊ सोहेल असे दोघे किराडपुरा भागातील बसरा मिल्क या डेअरीवर दूध घेण्यासाठी गेले होते. दुधाची पिशवी घेऊन दोघे घराकडे निघाले असतानाच रस्त्यावर पडलेल्या कॅरिबॅगमधील कार्बाईडसदृश वस्तूवर त्यांचा पाय पडला. पाय पडताच स्फोट झाला. स्फोट झाल्याने वसीमच्या हातातील दुधाची बॅग दूर फेकली गेली आणि तो खाली पडला. हा प्रकार लक्षात येताच जवळील दुकानात बसलेले सलीम पटेल वाहेगावकर हे मदतीला धावले. तेवढ्यात बाजूलाच असलेल्या इकरा अनिस (वय सहा) या मुलीचा पायही त्या पावडरवर पडल्याने दुसरा स्फोट झाला. नागरिकांनी दोघा जखमींना अमान रुग्णालयामध्ये दाखल केले. इकरावर उपचार करून तिला घरी पाठविण्यात आले. वसीमच्या तळपायाला मोठी जखम झाली आहे. नेमका स्फोट कशाचा झाला, हे ठामपणे कुणालाही सांगता येत नव्हते. आझाद चौक व किराडपुरा परिसरात मोठ्या प्रमाणावर भंगारची दुकाने आहेत. त्याचप्रमाणे फळे पिकविण्याची गोदामे आहेत. त्यामुळे या दोन्ही व्यवसायांच्या अनुषंगाने चर्चा सुरू होती, भंगारामध्ये आलेल्या वस्तूच्या रसायनामुळे स्फोट झाला असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत होता.

दुसरीकडे फळे पिकविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कार्बाईडची पुडी रस्त्यावर पडली, त्यानंतर प्रचंड ऊन किंवा पाण्याच्या संपर्काने हा स्फोट झाला असावा, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रथमदर्शनी कार्बाईडसदृश वस्तूनेच हा स्फोट झाला असून, यात घातपाताची कुठलीही शक्‍यता नसल्याचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले.

जिन्सी पोलिस ठाण्यामार्फत घटनेचा पंचनामा करून गुन्हा दाखल केला आहे.

किराडपुरा रस्त्यावर झालेला स्फोट हा प्रथमदर्शनी कार्बाईडचा असल्याचा अंदाज आहे. सखोल तपास आणि न्यायवैद्यक विभागाच्या अहवालानंतर खरा प्रकार स्पष्ट होईल; मात्र या स्फोटात घातापाताची कुठलीही शक्‍यता नाही.
- अमितेशकुमार, पोलिस आयुक्त

Web Title: two child injured in carbide blast