शेवगा येथील दोघांचा डेंगीसदृश तापाने मृत्यू

शेवगा येथील दोघांचा डेंगीसदृश तापाने मृत्यू

करमाड (जि.औरंगाबाद) : औरंगाबाद तालुक्‍यातील शेवगा येथे गेल्या काही दिवसांपासून तापेची साथ सुरू आहे. त्यातच औरंगाबाद शहरातील खासगी रुग्णालयात येथील दोघांवर उपचार सुरू होते. यात दोघांचाही गुरुवारी (ता.तीन) रात्री डेंगीसदृश तापाने उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना घडली. आजही गावात कित्येक रुग्ण तापसदृश आजाराने ग्रस्त आहेत. प्रकाश राठोड (वय 52) व तुळसीराम साळवे (वय 60, दोघे रा. शेवगा, ता.औरंगाबाद) अशी या डेंगीसदृश तापाने मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत.

दरम्यान, या घटनेने गावात एकच खळबळ उडाली असून, भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा धसका घेत आरोग्य विभागाला उशिरा का होईना जाग आली व या विभागाच्या वतीने शुक्रवारी (ता.चार) गोलटगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांच्या सात सदस्यीय पथकाने संपूर्ण गावात तपासणी मोहीम राबवली. यात या पथकास चार रुग्ण तापेने फणफणल्याचे आढळून आल्याने त्यांचे रक्त तपासणीसाठी घेण्यात आले आहे.


मागील काही दिवसांपासून शेवगा येथे तापेची साथ सुरू आहे. मृत प्रकाश राठोड यांना काही दिवसांपूर्वी ताप आली असता त्यांनी गाढेजळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखवून औषधोपचार घेतले. तथापि, त्यांना पूर्ण आराम मिळाला नाही व ताप दिवसेंदिवस वाढतच चालल्याने त्यांना 4-5 दिवसांपूर्वी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी या ठिकाणी केल्या गेलेल्या रक्ततपासणीत त्यांना डेंगीसदृश तापाची लागण झाल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार उपचार सुरू असताना गुरुवारी (ता.तीन) सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांचे निधन झाले.
दुसरे मृत तुळसीराम साळवे यांनीही सुरवातीला करमाड येथे उपचार घेतले. मात्र, तरीही ताप कमी होत नसल्याने शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना गुरुवारी (ता.तीन) मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला.

आरोग्य विभागाचा गलथान कारभार
शेवगा हे गाव गोलटगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या गाढेजळगाव येथील उपकेंद्राशी जोडलेले आहे. येथील कर्मचारी नेहमीच्या लसकरणाव्यतिरिक्त गावात येत नसल्याने ही परिस्थिती ओढावल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. आजही गावात कित्येक जण तापाने आजारी आहेत. त्यामुळे वरिष्ठांनी त्वरित हे प्रकरण गांभीर्याने घेऊन धूरफवारणी करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे.


16 ते 28 ऑगस्टदरम्यान झालेल्या तपासणीवेळी गावात तापेची साथ नव्हती. दोन रुग्णांचा मृत्यू झाला असला तरी तो डेंगीच्या तापाने झाला आहे हे निष्पन्न झालेले नाही. शुक्रवारी माझ्यासह सात सदस्यीय पथकाने गावात तपासणी केली. परिस्थिती आटोक्‍यात असून चार-पाच जणांना किरकोळ ताप असल्याचे आढळले. तपासणीसाठी त्यांचे रक्त घेण्यात आले आहे.
- डॉ. शाहीन हश्‍मी, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com