पीक उद्‌ध्वस्त झाल्याने दोघा शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

बीड जिल्ह्यात पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने हतबल शेतकऱ्याने नुकसान आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्यांचा मार्ग अवलंबला आहे. सध्या पिकांचे पंचनाम सुरू असले तरी भरपाई कधी अन्‌ किती मिळेल, याची शेतकऱ्यांना चिंता आहे. ग्रामीण भागातील सर्व आर्थिक घडी विस्कटून गेली आहे. 

बीड - बीड जिल्ह्यात पिकांचे नुकसान झाल्याने अख्तर अब्दुल शेख (वय 62, रा. म्हाळसजवळा, ता. बीड) यांनी आत्महत्या केली. अख्तर अब्दुल शेख यांनी रविवारी (ता. तीन) रात्री उशिरा विष प्राशन केले. सोमवारी दुपारी त्यांचा मृतदेह शेतात आढळला. 

दुसरी घटना परळी तालुक्‍यात घडली. पावसामुळे शेतातील काढणीस आलेले पीक वाया गेल्याने परळी तालुक्‍यातील खोडवा सावरगाव येथील तरुण शेतकरी सोमनाथ ज्ञानोबा दहिफळे (वय 22) याने विष पिऊन आत्महत्या केली. तालुक्‍यात 15 दिवसांपासून परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे काढणीस आलेले सोयाबीन, उडीद, ज्वारी आदी पिके नष्ट झाली आहेत. नगदी पीक म्हणून ओळखले जाणाऱ्या कापसाच्या वाती झाल्या आहेत.

खोडवा सावरगाव परिसरातही या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सोमनाथ दहिफळे यांच्या शेतातील सर्व पिके नष्ट झाली आहेत. यामुळे अगोदरच कर्जबाजारी व पुन्हा पीक नष्ट झाल्याने पुढील काळात काय करायचे, या विवंचनेत सोमनाथ दहिफळे होता. त्याने बुधवारी (ता. 30) विषारी औषध प्राशन केले होते. दहिफळे यांच्या आत्महत्येमुळे घरातील कर्ता पुरुष गेला असून, यानंतरही खोडवा सावरगाव परिसरातील शेतकऱ्यांना शासनाकडून कुठलीच मदत मिळालेली नाही. या आत्महत्येप्रकरणी येथील ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two farmers commit suicide