ड्रेनेजमध्ये गुदमरून दोघांचा मृत्यू, तीन गंभीर 

drainage line
drainage line

औरंगाबाद - मॅनहोलमध्ये अनधिकृत टाकलेल्या पाण्याच्या मोटारीच्या फुटबॉलमध्ये अडकलेला कचरा काढण्यासाठी गेलेले तीन शेतकरी विषारी वायूमुळे अत्यवस्थ झाले. त्यांनावाचविण्यासाठी आणखी चौघे गेले. सातही जण गुदमरल्याने यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तिघांची प्रकृती गंभीर असून, एकजण मॅनहोलमधून चेंबरमध्ये वाहत गेल्याने बेपत्ता आहे. ही खळबळजनक घटना सोमवारी (ता. 18) दुपारी दोनदरम्यान उत्तरानगरी, पॉवरलूमच्या दफनभूमीमागे सुखना नदीपात्रातील मॅनहोलमध्ये घडली. रात्री उशिरापर्यंत बेपत्ताचा अग्निशमन विभागाचे पथक शोध घेत होते. 

पोलिसांकडून व नातेवाइकांकडून प्राप्त माहितीनुसार, जनार्दन विठ्ठल साबळे (वय 50, रा. कावडे यांचे शेत आखाडा, मूळ वरझडी, ता.जि. औरंगाबाद), दिनेश जगन्नाथ दराखे (37, रा. चिकलठाणा) अशी मृतांची नावे आहेत. रामेश्‍वर पेरुबा डांबे (27, रा. निकळक अकोला, ता. बदनापूर) हा बेपत्ता आहे. प्रकाश वाघमारे (55), रामकिसन रंगनाथ माने (47, रा. मूळ दगडवाडी, ता. भोकरदन), उमेश जगन्नाथ कावडे (32) या तिघांची प्रकृती गंभीर असून, नवनाथ रंगनाथ कावडे (40) यांची प्रकृती धोक्‍याबाहेर आहे. त्यांच्यावर धूत रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सुखना नदीपात्राला लागून एकनाथ व विश्‍वनाथ कावडे बंधूंची शेतजमीन आहे. येथे चार बटईदार असून, ते शेती करतात. सुखना नदीपात्रातील भूमिगत गटारीत मॅनहोलमध्ये उतरून शेतकऱ्यांनी पाण्याच्या मोटारी टाकल्या आहेत. या मोटारीद्वारे गटारीचे पाणी उपसून शेतीसाठी पुरविले जात होते. पाणी उपसताना मोटारीच्या फुटबॉलमध्ये कचरा अडकल्यानंतर तो काढण्यासाठी दरवेळी शेतकरी धोका पत्करून मॅनहोलमध्ये उतरत होते. 
 
अशी घडली दुर्घटना 
दुपारी एक ते दीडच्या सुमारास जनार्दन साबळे, दिनेश दराखे व प्रकाश वाघमारे मॅनहोलमध्ये उतरले. त्या वेळी आत उग्र वास व विषारी वायूमुळे ते गुदमरून अत्यवस्थ झाले. ही बाब समजताच त्यांना काढण्यासाठी आखाड्यावरीलच रामकिसन माने, त्यांचे जावई रामेश्‍वर डांबे व उमेश कावडे गेले. पाठोपाठ गेलेले सर्वच जण अत्यवस्थ झाल्याचे पाहून शेतवस्तीवरील सर्वांनीच हंबरडा फोडला. यानंतर तिघांना स्थानिक नागरिक, तसेच अग्निशमन दलाने बाहेर काढले. दरम्यान, पोलिस फौजफाटा पोचला. दोन मृतांना घाटी रुग्णालयात, तर चौघांना धूत
रुग्णालयात दाखल करण्यात आले. 
 

माझे वडील रामकिसन व भाऊजी रामेश्‍वर आत गुदमरल्याचे समजताच हादरलो. लगेचच मी व नवनाथ कावडे याने मॅनहोलकडे धाव घेतली. आम्ही दोघांना बाहेर काढले. त्या वेळी नवनाथ अत्यवस्थ झाला. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तिघांना काढले; पण भाऊजींचा शोध लागला नाही. 
- शिवशंकर माने, प्रत्यक्षदर्शी. 
 
गुदमरून शेतकऱ्यांचा मृत्यू झाला व काहीजण अत्यवस्थ झाले. मृतांच्या नातेवाइकांना शासकीय मदत ज्या पद्धतीने मिळायची ती मिळेल. जखमींच्या उपचाराचा खर्च महापालिकेने
करावा, अशा सूचना मी दिल्या असून, उपचारही सुरू आहेत. घटना दुर्दैवी असून, शेतकऱ्यांना पिके जगविण्यासाठी व उदरनिर्वाह करण्यासाठी मॅनहोलमध्ये मोटारी टाकल्या. 
- हरिभाऊ बागडे, विधानसभा अध्यक्ष. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com