हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय; दोन तरुणी, ग्राहकांसह हॉटेल मालक, नोकर अटकेत

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 17 October 2020

राजूर रस्‍त्यावरील हॉटेल ऋतुराज येथे सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर शनिवारी (ता.१७) रात्री स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून दोन तरुणींसह दोन ग्राहकांना अटक केली आहे.

जालना : राजूर रस्‍त्यावरील हॉटेल ऋतुराज येथे सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर शनिवारी (ता.१७) रात्री स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून दोन तरुणींसह दोन ग्राहकांना अटक केली आहे. यातील एक मुलगी ही अल्पवयीन आहे. राजूर रस्त्यावरील हॉटेल ऋतुराज येथे बाहेरून महिला आणून अवैध वेश्या व्यवसाय केला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली.

प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक हसन गोहर यांच्यासह पोलिस स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी आपल्या पथकास शनिवारी छापा टाकला. यावेळी हॉटेलची झाडाझडती घेतली असता हॉटेलमधील दोन वेगवेळ्या खोल्यांमध्ये दोन तरूणी व ग्राहक सुनील विलास मरकड (रा.गोंदी, ता.अंबड, हल्ली मुक्काम चंदणझिरा), संदीप मिठ्ठु गवळी (रा.योगेशनगर, जालना) यांना अटक करण्यात आली आहे.

पालकमंत्री गडाखांनी शेतकऱ्यांसमवेत बांधावरच घेतली बैठक, अधिकाऱ्यांना घेतले बोलवून

तसेच पोलिसांनी हॉटेल मालक गोविंद रमेश वावणे, नोकर राजू पैठणकर (दोघे रा.घानेवाडी, ता.जालना) या दोघांनाही अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून मोबाइल, रोख रक्कम, निरोध असा मुद्देमाल जप्त केला आहे. तर या हॉटेलसमोर असलेल्या ऋतुराज बिअर शॉपीची ही पोलिसांनी झाडाझडती घेतली असता पाच हजार ६० रुपयांच्या विविध कंपनीच्या अवैध विदेशी व देशी दारू आढळून आली आहे. या कारवाई एकूण एक लाख ८८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक विनायक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक हसन गोहर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांच्यासह कर्मचाऱ्यांची कामगिरी ही कारवाई केली आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two Girls, Customers, Hotel Owner And His Employee Arrested Jalna News